डोंबिवली- रामनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चिपळूणकर रस्त्यावरील डाॅमिनोज पिझ्झा दुकानाचे मुख्य प्रवेशव्दार उचकटून चोरट्याने तिजोरीतील दैनंदिन व्यवहाराची ८० हजार रुपयांची रक्कम चोरुन नेली. सोमवारी मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला.
दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा चोरीचा प्रकार कैद झाला आहे. व्यवस्थापक अमित वाल्मिकी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अनोळखी इसमा विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. चिपळूणकर रस्ता हा सर्वाधिक वर्दळीचा असून रेल्वे स्थानकालगतचा हा परिसर आहे. सोमवारी मध्यरात्रीनंतर एक इसमाने दुकानाचे मुख्य प्रवेशव्दार लोखंडी कटावणीने उचकटून दुकानात प्रवेश केला. हाॅटेलमधील सुरक्षित कक्षातील तिजोरीत ठेवलेली ८० हजाराची रक्कम चोरुन त्याने पोबारा केला. त्याने तोंडाला रुमाल बांधला होता. दुकान मालक सकाळी हाॅटेल उघडण्यासाठी आला, तेव्हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. रामनगर पोलीस सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.



