आतापर्यंत चोर चोरीसाठी दुचाकी, चारचाकी वाहने वापरतात किंवा लपून छपून चोरीची वाहने वापरून आपला चोरीचा कार्यभाग साधतात. पण, कल्याण पूर्वेत बँक ऑफ इंडियाची एका खोलीतील दोन एटीएम फोडून २७ लाख रुपये चोरणारे ‘तंत्रज्ञ कुशल विव्दान’ चोर आपल्या सहकाऱ्यांना चोरीचे मार्गदर्शन करण्यासाठी हरियाणामधून विमानाने मुंबईत आणि तेथून कल्याणमध्ये आले होते. अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणातील दोन चोरांना कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे चोर मोबाईलवर बोलताना पोलीस सापळा किंवा अन्य कोणत्या संभाषणात अडकू नये म्हणून वेब लिंकच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत होते. हे साधे चोर नसून ते तंत्रज्ञ कुशल असल्याने या चोरांचा पाठीराखा खूप मोठा असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त करून त्या दिशेने तपास सुरू केला आहे.

चारही चोर पुन्हा विमानाने हरियाणाला रवाना –

एटीएम चोरी प्रकरणात सरफुद्दीन खान (रा. साकीनाका, अंधेरी), उमेश प्रजापती (रा. शीळफाटा) यांना कोळसेवाडी पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या माध्यमातून अटक केली आहे. ही चोरी करण्यापूर्वी उमेश, सरफुद्दीनला एटीएममध्ये चोरी कशी करायची. एटीएम फोडण्यासाठी कोणत्या हत्यार, तंत्राचा वापर करायचा याची माहिती देण्यासाठी हरियाणा येथून चार कुशल तंत्रज्ञ चोर हरियाणा येथून विमानाने मुंबईत आले. तेथून ते लोकलने कल्याणला पोहचले. त्यांनी सरफुद्दीन, उमेशला एटीएम फोडण्यासाठी झटपट तंत्राची माहिती देऊन प्रवृत्त केले. बँक ऑफ इंडियाची एक खोलीतील दोन एटीएम फोडून सहा जणांनी २७ लाख रुपयांची रक्कम एटीएममधून चोरली. काही रक्कम उमेश, सरफुद्दीन यांना देऊन उर्वरित रक्कम घेऊन चारही चोर पुन्हा विमानाने हरियाणाला रवाना झाले, अशी माहिती अटक आरोपींनी पोलिसांना दिली. हा सगळा प्रकार ऐकून पोलीस हैराण आहेत.

कल्याण पूर्वेतील म्हसोबा चौकात कवठे सोसायटीच्या तळ मजल्याला बँक ऑफ इंडियाची दोन एटीएम आहेत. मध्यरात्रीच्या वेळेत दोन्ही एटीएम फोडून त्यामधून २७ लाख ६७ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लुटून नेली होती. या प्रकरणी पेमेंट सर्व्हिसेस सिस्टीमचे तंत्रज्ञ सिध्दार्थ सूर्यवंशी यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. तंत्रज्ञ कुशल चोरांचा पाठीराखा आणि कोणत्या विमानाने चार चोर पुन्हा हरियाणाला गेले. याची माहिती पोलीस घेत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Theft from atm in kalyan by thieves from haryana two arrested msr
First published on: 23-06-2022 at 12:31 IST