धनादेश, डी.डी, ऑनलाईनद्वारे ९० टक्के कर वसुली
करोना टाळेबंदीच्या काळापासूनच आर्थिक संकटांचा सामना करत असलेल्या ठाणे महापालिकेच्या तिजोरीत जानेवारी महिनाअखेरपर्यंत ५९१ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ११० कोटींची अधिक मालमत्ता कर वसुली झाली आहे. तसेच ९० टक्के नागरिकांनी धनादेश, डी.डी, ऑनलाईनद्वारे कर भारणा केला असून यामुळे या सुविधेला नागरिकांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा >>>वाहन कोंडी टाळण्यासाठी पेंढरकर काॅलेज ते घरडा सर्कल वाहतुकीचे नियोजन
ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणून मालमत्ता कर ओळखला जातो. करोना काळात महापालिकेच्या मालमत्ता कर वगळता विविध विभागांच्या उत्पन्न वसुलीवर मोठा परिणाम झाला. तेव्हापासूनच खर्च आणि उत्पन्नाचे गणित बिघडल्याने महापालिका आर्थिक संकटांचा सामना करीत असून हेच चित्र आजही कायम आहे. अशा परिस्थितीत यंदाही मालमत्ता करवसुलीमुळेच पालिकेला काहीसा आर्थिक दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे. ठाणे महापालिकेच्या तिजोरीत जानेवारी महिनाअखेरपर्यंत ५९१ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच ३१ मार्चपर्यंत ५९१ कोटींची मालमत्ता कर वसुली झाली होती. शिवाय, मागील वर्षीच्या तुलनेमध्ये ११० कोटींनी अधिकचा मालमत्ता कर वसुल झालेला आहे.
मालमत्ता कराचा भरणा वेळेवर व्हावा यासाठी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी वेळोवेळी बैठका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले होते. तसेच करवसुलीसाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी कर वसुलीसाठी नियोजन केेले होते. नागरिकांना कर भरणे सुलभ व्हावे यासाठी शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी महापालिकेची सर्व प्रभाग कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती तसेच ऑनलाईन प्रणाली सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली होती. तसेच आयुक्त बांगर यांनीही नागरिकांना कर भारणा करण्याचे आवाहन केले होते. या सर्वामुळेच मालमत्ता कर वसुलीत वाढ झाल्याचा दावा पालिकेने केला आहे.
हेही वाचा >>>ठाणे: क्लस्टर योजनेतील इमारत उभारणीची कामे लवकरच सुरु होण्याची चिन्हे
यंदाच्या वर्षात उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात ३९.८८ कोटी, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात ७२.२६ कोटी, कळवा प्रभाग समिती क्षेत्रात २०.४६ कोटी, मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात २४.३१ कोटी, दिवा प्रभाग समिती क्षेत्रात २६.७८ कोटी, वागळे इस्टेट प्रभाग समिती क्षेत्रात १९.५३ कोटी, लोकमान्य-सावरकरनगर प्रभाग समिती क्षेत्रात २२.९९ कोटी, वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात ८४.६५ कोटी, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात २०६.३७ कोटी आणि मुख्यालयाकडे ७५.६६ कोटींची वसुली झालेली आहे. घरबसल्या ऑनलाईन पध्दतीने तसेच धनादेश, डी.डी. च्या माध्यमातून ९० टक्के नागरिकांनी कर भरणा केला आहे. तर १० टक्के नागरिकांनी महापालिकेच्या प्रभाग स्तरावरील संकलन केंद्राच्या माध्यमातून कर जमा केला आहे.
ठाणेकरांना मालमत्ता कर भरण्याबाबत आवाहन केले होते, त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिकांनी कर भरणा केल्याबद्दल त्यांचे आभार आहेत. तसेच अजूनही दोन महिने बाकी असून ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापर्यत मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी त्वरीत भरणा करुन महापालिकेस सहकार्य करावे. –अभिजीत बांगर,आयुक्त, ठाणे महापालिका