डोंबिवली- डोंबिवली पश्चिमेतील एका रहिवाशाचा बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्याने घरातील इतर किमती ऐवज चोरून नेण्याऐवजी घरातील स्नानगृह, स्वच्छतागृह, हातधुणी भांड्यातील एकूण १६ नळ काढून त्यांची चोरी केली आहे. बाजारभावाप्रमाणे या नळांची किंमत ३१ हजार रुपये आहे. या चोरीप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात रहिवाशाने तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. किशोर भाऊसाहेब जोंधळे (५५) असे तक्रारदाराचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, किशोर जोंधळे यांचे शिवनेरी इमारत, महात्मा फुले रस्ता, विष्णुनगर, डोंबिवली पश्चिम येथील घर २८ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत ते बाहेरगावी गेल्याने बंद होते. रविवारी घरी परतल्या नंतर त्यांना घराचा कोयंडा तुटल्याचे दिसले. त्यांना घरात चोरी झाल्याचा संशय आला. त्यांनी घरात जाऊन पाहिले तर घरातील सामान चोरट्याने अस्ताव्यस्त फेकून दिले होते. चोरट्याने किशोर जोंधळे यांच्या घराच्या स्वच्छतागृह, स्नानगृह आणि हातधुणी भांड्यातील एकूण १६ नळ सुस्थितीत काढून नेले असल्याचे किशोर यांना आढळले.

चोऱट्याने घरात घुसून मौल्यवान वस्तू ऐवजी नळ काढून नेल्याने पोलीसही आश्चर्यचकित झाले. चोरटा प्लम्बर आहे की काय किंवा काढून नेलेले नळ चोरटा प्लम्बरला विकण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. किशोर यांनी अज्ञात चोरट्या विरुध्द याप्रकरणी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. काही हार्डवेअर दुकानदारांना चोरटा कमी किमतीत नळ विकण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी काही हार्डवेअर वस्तू विक्रेता दुकानदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.