डोंबिवली- लांब पल्ल्यांच्या मेल, एक्सप्रेसमधून प्रवासी म्हणून प्रवास सुरू करून प्रवासी झोपल्यानंतर त्यांच्या पिशव्यांमधील रोख, दागिन्यांचा ऐवज चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला मध्य रेल्वे मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने ठाणे रेल्वे स्थानकातून सोमवारी अटक केली. त्याच्याकडून सहा लाख ७६ हजार रुपयांचा १३० ग्रॅम वजनाचा सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरेंद्र भलेराम धानक (४२) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या इतर साथीदारांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पिशव्यांमधील किमती ऐवज, रोख रक्कम चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. मुंबईतून प्रवासाला सुरुवात करुन परप्रांतामधील आपल्या गावी जाईपर्यंत अनेक प्रवाशांना पिशवीतील किमती ऐवज चोरीला गेल्याचे दिसत होते. परतीच्या प्रवासात अनेक प्रवाशांना हा अनुभव येत होता. याप्रकरणी ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई लोहमार्ग पोलीस ठाण्यात प्रवाशांच्या तक्रारीवरुन गुन्हे दाखल झाले होते.

पालघर जिल्ह्यातील विरार येथील तिरुपती नगरमध्ये राहणारे सरेश नायक मंगलोर उद्यान एक्सप्रेसने उडपी रेल्वे स्थानकातून पालघरला येण्यासाठी प्रवास करत होते. प्रवासात पिशव्या त्यांनी मंचकावर ठेवल्या होत्या. दुसऱ्या दिवशी मंगलोर एक्सप्रेस भिवंडी जवळील खारबाव रेल्वे स्थानकातून जात असताना, सुरेश यांना मंचकावर  ठेवलेल्या पिशवीची दिशा बदलेली दिसली. त्यांनी पिशवी खाली घेऊन पाहिले तेव्हा त्यांना त्यात पिशवीत ठेवलेली सोन्याच्या सहा लाख ७६ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची पिशवी चोरीला गेल्याचे दिसले. पालघर रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर सुरेश नायक यांनी ही घटना डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत घडली असल्याने या पोलीस ठाण्यात तक्रार केली.

अशा चोऱ्या पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांनी स्वतंत्र तपास पथके तयार केली होती. मुंबई गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख यांना सुरेश नायक यांच्या चोरीची माहिती मिळाल्यानंतर, शेख यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक होळकर, हवालदार गजानन शेंडगे, संदीप गायकवाड, अतुल साळवी, अतुल धायडे, रवींद्र दरेकर, वैभव शिंदे, अमित बेडेकर, अनिल खाडे, सतीश धायगुडे, गणेश माने, शशिकांत कुंभार, इम्रान शेख, हरीश संदानशिव, सुनील मागाडे यांनी मंगलोर उद्यान एक्सप्रेसच्या थांब्याच्या स्थानकावरील सीसीटीव्ही चित्रण तपासली. कल्याण ते भिवंडी दरम्यानच्या नायक यांच्या प्रवासाची माहिती घेतली. या संकलित केलेल्या माहितीमधून सुरेंद्र धानक या चोरट्याचे नाव पुढे आले. सुरेश हा ठाणे रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख यांना मिळाली. त्यांनी ठाणे रेल्वे स्थानक भागात सापळा लावला. ठरल्या वेळेत सुरेंद्र येताच, पोलिसांनी त्यांना घेरून ताब्यात घेतले.

सुरेंद्रची पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांनी चौकशी करताच, त्याने मंगलोर एक्सप्रेसमधील एका प्रवाशाच्या दागिन्यांची चोरी केली असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचा सहा लाखाचा सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला. त्याने आतापर्यंत साथीदारांच्या मदतीने अशा किती चोऱ्या केल्या आहेत. याचा तपास पोलीस करत आहेत. त्याच्या साथीदारांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thief stole cash change passengers express arrested confiscated ysh
First published on: 09-08-2022 at 11:24 IST