भिवंडी शहरात मोबाईल, सोनसाखळी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या चार जणांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. सुनील फुलारे (३०), आयाजअली अन्सारी (३८), दाऊद अन्सारी (२८) आणि सर्फराज खान (२६) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून ८ लाख १७ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली महापालिकेतील सावळागोंधळ आणि भाजपला चटके

भिवंडीत गेल्याकाही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने उपायुक्त योगेश चव्हाण यांनी कठोर कारवाई करण्याची सूचना सर्वच पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांना दिली होती. दरम्यान, भिवंडीचे साहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांनी विविध प्रकरणात कारवाई करून सुनील, अयाजअली, दाऊद आणि सर्फराज यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून शांतीनगर पोलीस ठाण्यातील १३, भिवंडी पोलीस ठाण्यातील दोन आणि नारपोली पोलीस ठाण्यातील एक असे १६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तसेच आरोपींकडून पोलिसांनी दोन सोनसाखळ्या, ११ दुचाकी, एक रिक्षा, एक मोबाईल असा ८ लाख १७ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी चारही जणांना अटक केली आहे.