डोंबिवली : शिळफाटा रस्त्यावरील रुणवाल गार्डन, पलावा या गृहसंकुलातील तीन रहिवाशांच्या मोटारींच्या काचा अज्ञात चोरट्याने सोमवारी संध्याकाळी फोडून मोटारीमधील कारटेप आणि सामान असा मिळून दोन लाख ९५ हजार रूपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला आहे.

पलावा, रुणवाल गार्डन येथे भक्कम सुरक्षा कडे आणि सुरक्षा रक्षक तैनात असताना या घटना घडल्याच कशा, असा प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित करण्यात आला आहे. आर गॅलरी रुणवाल गार्डन, कासारिओ स्मशानभूमीजवळ पलावा येथे या घटना घडल्या आहेत. या घटनेप्रकरणी कासाबेला, पलावा येथील सवाना सोसायटीत राहणारे देवेंद्र बाळकृष्ण शहाणे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

हेही वाचा…माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांनी सांगितले, पलावा वसाहतीत राहणारे देवेंद्र शहाणे यांची वॅगनॉर कार त्यांनी ते राहत असलेल्या सोसायटीच्या तळ मजल्याला वाहनतळावर उभी करून ठेवली होती. त्याच बरोबर त्यांच्या सहकाऱ्यांच्या दोन मोटारी आर गॅलरी येथे वाहनतळावर उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. सोमवारी संध्याकाळी साडे तीन नंतर अज्ञात चोरट्याने वाहनतळाच्या जागेत प्रवेश केला. त्याने टोकदार लोखंडी वस्तूने तिन्ही वाहनांच्या काचा फोडल्या. या मोटारींमधील कारटेप आणि इतर सामान असा एकूण दोन लाख ९५ हजार रूपयांचा ऐवज घेऊन चोरटा पळून गेला.

साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. डी. पालवे यांनी या गृहसंकुल परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. मोठ्या गृहसंकुलांमध्येही आता चोरट्यांनी शिरकाव केल्याने रहिवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

हेही वाचा…Dahi Handi 2024 Celebration : अडीच वर्षांपुर्वी पापाची हंडी फोडली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तसेच, खोणी पलावा येथील ऑर्चिड क्राऊन सोसायटीत राहणाऱ्या सोाली सोमनाथ गिरी यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने सोसायटीच्या वाहनतळावरून चोरून नेली आहे. पलावा वसाहतीमधील या वाढत्या वाहन चोरी, वाहन तोडमोडीच्या घटनांनी रहिवासी हैराण आहेत.