कल्याण- सकाळ, संध्याकाळ गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये चढण्याच्या गडबडीत असलेल्या, लोकल पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलांसमोर अडथळा निर्माण करून त्यांच्या गळ्यातील, हातामधील सोन्याचा ऐवज हिसकावून किंवा कटरने कापून घेऊन पळून जाणाऱ्या दोन जणांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

सचिन गायकवाड, रवी इस्माईल जाधव असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. ते पोलिसांच्या खतरनाक गुन्हेगार यादीतील गुन्हेगार आहेत. पोलिसांनी सांगितले, गुजरातहून एक महिला अंबरनाथ येथे आपल्या पती आणि मुलीसह नातेवाईकांकडे आली आहे. तिला अंबरनाथहून कर्जत येथे जायाचे होते. कर्जत लोकलला गर्दी असते. यावेळेत महिलांच्या डब्याजवळ चोरीचा डाव यशस्वी करता येऊ शकतो. हा विचार करून सचिन गायकवाड, रवी जाधव हे कर्जत लोकल अंबरनाथ रेल्वे स्थानकात येताच, महिलांच्या डब्या जवळ गेले. स्थानकातील महिला डब्यात चढण्यासाठी लोकल दरवाजा जवळ गर्दी करून होत्या. लोकलमधील महिला प्रवासी उतरण्याच्या प्रयत्नात होत्या. या गर्दीचा फायदा घेऊन सचिनने गुजरातमधून आलेल्या महिला प्रवाशाला लोकलमध्ये चढण्यास अडथळा निर्माण करून तिला लोकलमध्ये चढता येणार नाही अशी हालचाल केली. या गडबडीत सचिनने महिलेच्या हातामधील सोन्याच्या बांगड्या धारदार यंत्राने महिलेला काही न कळून देता कापल्या. हा प्रकार महिलेच्या सोबत असलेल्या मुलाच्या लक्षात आला. त्याने आईला सावध करून हातामधील बांगड्या दोन प्रवाशांनी कापल्या आहेत हे निदर्शनास आणले. त्यावेळी महिलेने आणि तिच्या मुलाने चोर म्हणून मोठ्या फलाटावर ओरडा केला. तेवढ्यात सचिन आणि रवी दोघेही सोन्याच्या बांगड्या हिसकावून पळून गेले.

या महिलेने अंबरनाथ स्थानकावरील लोहमार्ग पोलिसांनी घडला प्रकार सांगितले. पोलिसांच्या सूचनेवरून महिलेने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्ररीच्या अनुषंगाने लोहमार्ग पोलिसांनी फलाटावरील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले. या चित्रीकरणात दोन जण महिलेच्या हातामधील बांगड्या कापत असल्याचे दिसत होते. दोन्ही चोरटे पोलिसांच्या खतरनाक गुन्हे नोंद यादीतील आहेत. असे पोलिसांच्या निदर्शनास आले.

लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे दोन्ही गुन्हेगारांचा माग काढला. त्यांना अटक केली. त्यांच्यावर यापूर्वी चोरीचे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून डोंबिवली ते बदलापूर, अंबरनाथ रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना लुटण्याचे प्रकार वाढल्याने प्रवासी हैराण आहेत. विशेष करून या चोरीत महिलांना विशेष लक्ष्य केले जात आहे.