आतापर्यंत दुकानात, घऱात, बँकेत चोरीचे प्रकार घडत होते. आता घरोघरी सिलिंडर वितरण करणारे कामगारही सिलिंड़रच्या किमती वाढताच भरलेल्या सिलिंडरच्या माध्यमातून अपहार करून झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहू लागले आहेत. दोन सिलिंडर वितरक कामगारांनी डोंबिवली एमआयडीसीतील गॅस एजन्सीमधील भरलेले सिलिंडर परस्पर विकले. तसेच, सिलिंडर वितरणातून जमा झालेली एकूण ५६ हजार रूपयांची रक्कम घेऊन पलायन केले आहे.

डोंबिवलीतील पेंढरकर महाविद्यालयाजवळील जयशक्ती भारत गॅस एजन्सी, शिवशक्ती भारत गॅस एजन्सीमध्ये हे प्रकार घडले आहेत. व्यवस्थापक लखन सोनवणे यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केल्यावर हा चोरी, अपहाराचा प्रकार उघडकीला आला. हनुमान बिश्णोई (रा. विमल इमारत, सागर्ली.), श्रवणकुमार बिश्णोई (रा. रामशाम इमारत, सागर्ली गाव, डोंबिवली पूर्व) अशी फरार वितरक कामगारांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले, पेंढरकर महाविद्यालयाजवळ जयशक्ती भारत गॅस एजन्सी आहे. या एजन्सीतून एमआयडीसी, २७ गाव परिसरात गॅस सिलिंडर वितरीत केली जातात. या एजन्सीतील सिलिंडर वितरक कामगार हनुमान बिश्णोई याने एजन्सीच्या गोदामातून २५ भरलेले सिलिंडर व्यवस्थापक सोनवणे यांच्या उपस्थितीत काढून ते वितरणासाठी एकटाच कोळेगाव येथे टेम्पोतून घेऊन गेला. सिलिंडर वितरण करून आल्यानंतर हनुमानकडून एजन्सीत ग्राहकांकडून मिळालेले सात हजार रूपये भरणा होणे आवश्यक होते.

सकाळी कोळेगावात सिलिंडर वितरणासाठी गेलेला हनुमान दोन वाजून गेले तरी आला नाही म्हणून सोनवणे यांनी सिलिंडर गोदामात तो आले का पाहण्यासाठी फेरी मारली. तेथे हनुमानने सिलिंडर भरून नेलेला रिकामा टेम्पो उभा होता. हनुमान सिलिंडर वितरण करून आला आहे, तो एजन्सीत का आला नाही म्हणून सोनवणे यांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला. तो बंद होता. संध्याकाळी कार्यालय बंद करण्याची वेळ आली तरी हनुमान न आल्याने सोनवणे यांनी हनुमानने उभ्या केलेल्या टेम्पोची तपासणी केली. टेम्पोत नऊ भरलेले सिलिंडर कमी दिसून आले. हनुमानने नऊ सिलिंडर एक हजाराहून अधिक चढ्या किमतीला काळ्या बाजारात विकले. तसेच इतर सिलिंडरची सात हजार रूपयांची रक्कम घेऊन तो पळून गेला आहे. अशी खात्री व्यवस्थापक सोनवणे यांची झाली.

असाच प्रकार व्यवस्थापक सोनवणे यांच्या कार्यालयाच्या बाजुला असलेल्या शिवशक्ती गॅस एजन्सीत घडला. या एजन्सीतील कामगार श्रवणकुमार बिश्णोई याने देसलेपाडा येथे एजन्सी गोदामातून २७ भरलेले सिलिंडर वितरणासाठी नेले. तेथून परतल्यावर श्रवणकुमारने गोदामाच्या आवारात रिकाम्या सिलिंडरचे वाहन गुपचूप उभे करून व्यवस्थापकाला न सांगता पळून गेला. श्रवणकडे सिलिंडर वितरणातून मिळालेली २७ हजार रूपयांची रोख रक्कम, एक रेग्युलेटर होते.

दोघांनी संगनमत करून गॅस सिलिंडरच्या माध्यमातून ५६ हजार रूपयांचा गैरव्यवहार करून पलायन केले. ही रक्कम घेऊन ते गावी पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी लांबपल्ल्याच्या एक्सप्रेसवर नजर ठेवली आहे. उपनिरीक्षक के. डी. गांगुर्डे याप्रकरणाचा तपास करत आहेत.