अंबरनाथ तालुक्यात कुशिवली धरण उभारणीच्या प्रक्रियेत बनावट दस्तऐवज सादर करून भूसंपादन मोबदला लाटण्याचे प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी मंगळवारी तिसऱ्या गुन्ह्याची नोंद झाली. या प्रकरणात तब्बल ६० लाख रूपयांचा मोबदला लाटण्यात आला आहे. याप्रकरणानंतर भूसंपादन मोबदला अपहाराची रक्कम एक कोटी २३ लाख रूपयांवर पोहोचली आहे. उपविभागीय कार्यालयाने केलेल्या तपासणीत आतापर्यंत तीन प्रकरणे उघडकीस आले असून यात आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

अंबरनाथ तालुक्यात नव्या जलस्त्रोतांची उभारणी करण्याच्या दृष्टीने कुशवली येथे धरणाचा प्रस्ताव मंजुर करण्यात आला. या कामासाठी ८५.४० हेक्टर क्षेत्राची आवश्यकता होती. उल्हासनगरच्या उपविभागीय कार्यालयाकडून ही प्रक्रिया गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. आतापर्यंत ५२. २४ हेक्टर क्षेत्राची भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून ५३ खातेधारकांना सुमारे ११ कोटी ५१ लाख रूपयांची रक्कम मोबदला स्वरूपात अदा करण्यात आली आहे. याच प्रक्रियेत डिसेंबर महिन्यात बनावट कागदपत्रे सादर करून मोबदला लाटण्याचा प्रयत्न केल्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनाल आले होते. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला.

गेल्या काही महिन्यात मोबदला अपहार प्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले असून अनुक्रमे ४७ लाख २४ हजार आणि १६ लाख ५९ हजार रूपयांचा मोबदला अपहार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी उपविभागीय कार्यालयातील निवृत्त नायब तहसिलदारांचा सक्रीय सहभाग दिसल्याने पोलिसांनी त्यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यातच या अपहार गुन्हे मालिकेत मंगळवारी तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी तब्बल ६० लाख रूपयांचा मोबदला लाटल्याचे समोर आले आहे.

सर्वे क्रमांक ९/३ या जागेच्या मोबदल्यासाठी मुळ मालक नाथा दुंदा भाग्यवंत यांच्या नावे ते हयात असतानाही बनावट कागदपत्रे सादर करून मोबदला लाटण्यात आला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिसऱ्या गुन्ह्यानंतर लाटण्यात आलेल्या मोबदल्याची रक्कम १ कोटी २३ लाख इतकी झाली आहे. तर आतापर्यंत वाटप करण्यात आलेल्या मोबदल्याची रक्कम ११ कोटींच्या घरात आहे. त्यामुळे एकूण वाटप झालेल्या मोबदल्यापैकी आतापर्यंत सुमारे १० टक्के रकमेचा अपहार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.