सांस्कृतिक विश्व : शब्दसुरांची रिमझिमती बरसात..

गम परवीन सुलताना यांनी तर मैफलीचा ताबा घेतला. त्यांनीही रसिकांना अजिबात निराश केले नाही.

बेगम परवीन सुलताना यांनी तर मैफलीचा ताबा घेतला. त्यांनीही रसिकांना अजिबात निराश केले नाही

संगीत नेहमीच मनाला उभारी देते. गायकाच्या गळ्यातील ‘सा’ला जेव्हा रसिकांची ‘क्या बात है’ अशी दाद मिळते, तेव्हा मैफल एकरूप होते. सूर आणि तालांच्या अनोख्या स्वरमंडळाने सारे वातावरण भारून जाते. असेच काहीसे चित्र ठाण्यातील सहयोग मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वर हवीस संगीत’ महोत्सवात ठाणेकरांना अनुभवता आले.
युनिव्हर्सल इव्हेंट हब यांच्या सहकार्याने भारतरत्न पंडित ‘भीमसेन जोशी’ आणि गानभास्कर पंडित ‘माधव’ गुडी यांच्या स्मरणार्थ ‘स्वर हवीस संगीत’ महोत्सव या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी समीप कुलकर्णी यांनी सतार वादन केले. या वेळी विनोद सुतार यांनी त्यांना तबल्याची साथ केली. सतारीच्या सुरांनी सारे सभागृह सुरांच्या पावसात न्हाऊन निघाले होते. त्यानंतर तालमणी मुकुंदराज देव यांनी काळ्या शाईवर आपल्या बोटांची जादू दाखवून रसिकांना रिझवले. शनिवारी सायंकाळी रतीश तागडे यांच्या सुरेल व्हायोलीन वादनाने रसिकांची मने प्रसन्न झाली. संगीत आनंद देतेच, शिवाय शरीरात एक ऊ र्जाही निर्माण करते. जेव्हा रसिक सभागृहाबाहेर पडतात, तेव्हा ही ऊर्जा सोबत घेऊनच बाहेर पडतात याचा अनुभव ठाणेकरांनी घेतला. वाद्याचा झंकार जेव्हा ऐकू येतो, त्या वेळी मनावरचे सारे ओझे हलके होत असल्याचा भाव रसिकांच्या चेहऱ्यावर उमटत होता. त्यानंतर अर्चना कान्हेरे आणि पंडित कैवल्यकुमार यांच्या शास्त्रीय संगीताने रसिकांच्या मनावर वेगळीच जादू केली. डॉ. रवींद्र घांगुर्डे आणि डॉ. वंदना घांगुर्डे यांनी ‘मर्मबंधातील ठेव’ या कार्यक्रमाच्या नावाप्रमाणेच नाटय़संगीताचा इतिहास जागवला. मात्र कार्यक्रमात वेळ कमी पडल्याने या कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला.

कार्यक्रमाचे तिसरे पुष्प गुंफले ते म्हणजे, अनुपमा गुडी, आदित्य कल्याणपूर आणि बेगम परवीन सुलताना यांनी. पारिजातकांच्या फु लांचा सुगंध जसा दूपर्यंत दरवळतो, अगदी त्याचप्रमाणे या सर्वच कलाकारांची कीर्ती दूपर्यंत पसरलेली असल्यामुळे या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी झाली होती. या वेळी अनुपमा गुडी यांनी गुरूसमान असणारे पं. भीमसेन जोशी आणि वडील माधव गुडी यांना वंदून राग ‘तोडी’ सादर केला. तसेच ‘माझे माहेर पंढरी’ हे गाणे गाऊन सभागृहातील वातावरण भक्तीमय केले. त्यानंतर पं. अल्लारखाँ आणि उस्ताद झाकीर हुसेन यांचे शिष्य असणाऱ्या आदित्य कल्याणपूर यांनी आपल्या तबल्यातून तीन ताल आणि राग परमेश्वरी सादर केला. या वेळी त्यांना शिवसंगीत मिश्रा यांनी सारंगीची साथ केली. आदित्य यांची बोटे तबल्यावर फिरू लागताच रसिकांची ब्रह्मानंदी टाळी लागली. वेळोवेळी टाळ्यांचा कडकडाट करून रसिकांनी दिलखुलास दाद दिली. उत्तम कलाकारांचे कौतुक करावयास ठाणेकर रसिक कधीच मागे नसतात, याचा प्रत्यय या मैफलीच्या निमित्ताने पुन्हा एकदा आला.
त्यानंतर बेगम परवीन सुलताना यांनी तर मैफलीचा ताबा घेतला. त्यांनीही रसिकांना अजिबात निराश केले नाही. ६४ वर्षांच्या परवीन सुलताना यांनी आपल्या गळ्यातून ‘गुजरी तोडी’चे सादरीकरण केले. या रागाविषयी अत्यंत रोचक माहितीही त्यांनी दिली. सकाळच्या प्रहरी गाई-म्हशी चरायला नेणारे गुराखी विरंगुळा म्हणून बासरी वाजवत. बासरीतून निघणारे हे सूर राजे- रजवाडय़ांना खूप आवडले आणि त्यानंतर त्या तोडीचे रूपांतर गुजरी तोडीमध्ये झाले असल्याचे त्यांनी सांगितले. या गुजरी तोडीमध्ये त्यांनी ‘घर आयो बरमा’ आणि ‘कागवा जा रे जा रे’ या बंदिशी सादर केल्या. स्वर आणि शब्दांवरील त्यांची पकड लाजवाब अशीच होती. त्यानंतर त्यांनी मेघमल्हार रागातील ‘बादलिया बरसन लागे’ ही बंदीश गायला सुरुवात केली आणि बाहेर पाऊस बरसण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ‘रसिका तुझ्यासाठी मी एक गीत गाते’ हे गाणे त्यांनी सादर केले. त्यानंतर स्वत: लिहिलेले ‘बलम परदेस गये’ हे गाणे सादर केले. अखेर भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Three days music festival in thane

ताज्या बातम्या