डोंबिवली– डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुले रस्त्यावरील गायकवाड वाडी भागात मंगळवारी रात्री एका घरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन तीन जण जखमी झाले. या स्फोटामुळे आजुबाजुच्या घरांचे नुकसान झाले आहे. सिलिंडर टाकीतून शेगडीला जोडलेल्या पाईपमधून गॅस गळती होऊन हा स्फोट झाला असण्याचा प्राथमिक अंदाज पोलीस, अग्निशमन जवानांनी काढला आहे.

गायकवाड वाडीमध्ये पारसनाथ इमारतीच्या तळ मजल्याला मनीषा मोरेवकर (६५) राहतात. रात्रीच्या भोजनाची तयारी चालू असताना मोरेवकर यांच्या घरात अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटात मनीषा घराच्या दुसऱ्या दालनात असल्याने थोडक्यात बचावल्या. त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. घरातील दोन्ही दरवाजांच्या लाकडी चौकटी स्फोटाने उखडल्या आहेत. खिडक्यांच्या काचा, तावदाने तुटली आहेत. स्फोट होत असताना या इमारतीत राहणाऱ्या उरसुला लोढिया (४०) आणि त्यांचा लहान मुलगा रियांश (५) जिन्यावरुन मोरवेकर यांच्या घरा समोरून घरी जात होते. तेही हादऱ्याने जखमी झाले.

गरीबाचापाडा परिसर या स्फोटाने हादरला. विष्णुनगर पोलीस, अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच त्यांची पथके घटनास्थळी आली. त्यांनी तातडीने घराचा ताबा घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. स्फोट नक्की कशामुळे झाला याचा शोध सुरू केला आहे. गॅस गळती होऊन हा स्फोट झाला असण्याचा प्राथमिक अंदाज यंत्रणांनी काढला आहे. सखोल चौकशीतून स्फोटाचे कारण पुढे येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.