दुपारच्या वेळेत वाहतूक पोलीस चौक, रस्त्यांवर नसल्याने आणि या वेळेत रस्त्यांवर सामसूम असल्याने त्याचा गैरफायदा आता दुचाकी, भामट्या रिक्षा चालकांनी घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी दुपारी दावडी आणि डोंबिवलीतील चार रस्त्यावर दोन वेगळ्या घटनांमध्ये दुचाकीवरील भामट्यांनी दोन लाख ९४ हजार रुपयांची लूट केली.डोंबिवलीतील चार रस्त्यावर रंगोली हाटेल जवळ विमल सोरटे (७५, रा. स्टार कॉलनी) येथे महिलेच्या गळ्यातील सोन्याची ७० हजार रुपयांची, तर दावडी येथे राहणाऱ्या शुभांगी शिंदे (३९) यांच्या जवळील दोन लाख १४ हजार रुपयांची रक्कम भामट्यांनी लुटून नेली. टिळकनगर, मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> मुंब्ऱ्यात दोन गटामध्ये वाद , हल्लेखोर एमआयएमच्या कार्यालयात शिरल्याने पक्ष कार्यालयाचीही नासधूस

विमल सोरटे गुरुवारी दुपारी मानपाडा रस्त्याने घरी जात असताना रंगोली हाॅटेल जवळ त्यांना दोन इसम भेटले. त्यांनी विमल यांना आपण तुम्हाला ओळखतो. गळयात सोन्याची माळ ठेऊ नका. हल्ली चोरीचे प्रकार वाढले आहेत. असे बोलून विमल यांच्या गळ्यातील सोन्याची माळ काढून एका कापडी पिशवीत गुंडाळून हात चलाखीने सोन्याची माळ असलेली पिशवी स्वताकडे आणि रिकामी कापडाची पिशवी विमल यांच्या हातात दिली. आपण चहा पिण्यास जातो असे बोलून भामटे घटनास्थळावरुन पसार झाले. विमल यांनी कापडी उघडली तर त्यांना त्यात काही आढळून आले नाही. त्यावेळी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली.

हेही वाचा >>> डोंबिवली : बालिकेच्या मदतीने भिक्षा मागून गुजराण करणाऱ्या आजी-आजोबांना अटक

दुसऱ्या घटनेत दावडी येथे राहणाऱ्या शुभांगी शिंदे यांनी एचडीएफसी बँकेतून दोन लाख १० हजार रुपयांची रक्कम काढली होती. त्यांच्या जवळ चार हजार रुपयांची रक्कम होती. पैशांची पिशवी जवळ ठेऊन त्या घरी जाण्यासाठी शीळ रस्त्यावर रिक्षेची वाट पाहत होत्या. यावेळी दुचाकीवरुन दोन इसम शुभांगी यांच्या दिशेने आले. त्यांनी काही कळण्याच्या आत शुभांगी यांच्या हातामधील पैशाची पिशवी हिसकावून पळ काढला. त्यांनी ओरडा केला पण तो पर्यंत भामटे पळून गेले होते. मानपाडा पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार केली आहे.