ठाणे : मुंब्रा, शिळडायघर आणि कळवा शहरात मागील आठवड्याभरामध्ये तिघांची वेगवेगळ्या प्रकरणांत हत्या झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये दोघांची गळा चिरुन हत्या झाली आहे. तर एकाची डोक्यात दगड घालून हत्या झाली आहे. या घटनांमुळे मुंब्रा, कळवा, शिळ डायघर हादरले आहे. तर या प्रकरणात आरोपींना अटक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
यातील पहिले प्रकरण ७ मार्चला घडले. कळवा येथील विटावा भागातील बस थांब्याजवळ काही भिक्षेकरी राहतात. याच ठिकाणी एक मृतदेह स्थानिकांना आढळला. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या झाली होती. घटनेची माहिती कळवा पोलिसांना मिळाल्यानंतर कळवा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृताची ओळख पटवली असता, त्याचे नाव अनिल बेहरा असल्याचे समजले. तसेच तो झारखंड भागातील रहिवासी होता. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने तपास केला असता, त्या भागातून पोलिसांनी संतोष लाड (४५) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने वैमन्यस्यातून हत्या केल्याची कबूली दिली.
दुसरे प्रकरण मुंब्रा शिळफाटा भागातील आहे. ११ मार्चला रात्री ८ वाजता शिळफाटा येथील खान कंपाऊंड भागात राहणाऱ्या झाकीर मोल्ला (३९) याचा एकाने चाकूने गळा चिरला होता. त्याला परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती शिळडायघर पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. त्यावेळी पश्चिम बंगलामध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबत झाकीर याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याचा मित्र अश्रफुल मोल्ला (३४) याला होता. या तरुणीवर अश्रफुल याचे प्रेम होते. अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून अश्रफुल याने ११ मार्चला सायंकाळी ६ वाजता झाकीर याला त्याच्या घरामध्ये मद्य पिण्यास दिले. तो झोपल्यावर अश्रफुल याने त्याचा गळा चिरला. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अश्रफुल याला कल्याण रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले आणि अटक केली.
तर तिसरी घटना मुंब्रा येथे घडली. १२ मार्चला शीव रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मुंब्रा पोलिसांना कळविले की, मोहम्मद रहुल अजिम राईन (२५) या तरुणाच्या गळ्यावर वार करुन त्याच्यावर हल्ला झाला आहे. त्याला शीव रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मोहम्मद राईन याच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेचा पोलिसांनी तपास करुन सादिक सय्यद (१९) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. १० मार्चला सादिक याने परिसरातील चार ते पाच मोबाईल चोरी केले होते. यामध्ये मोहम्मद राईन याचा देखील मोबाईल होता. राईनला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तो सादिककडे त्याचा मोबाईल घेण्यासाठी गेला होता. परंतु याच दरम्यान, सादिक याने त्याच्या गळ्यावर वार केले. या हल्ल्यात उपचारा दरम्यान राईनचा मृत्यू झाला.