कल्याण पूर्वेत गुरुवारी मध्यरात्री एका रेल्वे अधिकाऱ्याला चाकुचा धाक दाखवून त्यांच्या जवळील मोबाईल, रोख रक्कम लुटणाऱ्या तीन तरूणांना लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी पाठलाग करून अटक केली.

कल्याण पूर्वेत काटेमानिवली भागात राहाणारे चंद्रकांत कारंडे मुंबईतील वांद्रे येथील रेल्वे कार्यालयात नोकरीला आहेत. घर ते कल्याण पूर्व रेल्वे स्थानक कारंडे स्वताच्या दुचाकीने प्रवास करतात. कल्याण पूर्व रेल्वे मालगाडी थांबा भागातील मोकळ्या जागेत ते दुचाकी उभी करून वांद्रे येथे कामाला जातात. हा त्यांचा नेहमीचा उपक्रम आहे. गुरुवारी मध्यरात्री ते दुसऱ्या पाळीचे काम संपवून कल्याण पूर्वेत आले. दुचाकी घेण्यासाठी ते मालगाडी थांबा परिसरात गेले.

दुचाकी काढून ते मुख्य रस्त्याला लागणार तेवढ्यात त्या भागात दबा धरून बसलेले तीन तरूण रेल्वे अधिकारी कारंडे यांच्या दुचाकीला आडवे आले. त्यांनी चाकुचा धाक दाखवून कारंडे यांच्या जवळील रोख रक्कम, मोबाईल काढून घेतला. प्रतिकार केला तर हल्ला होण्याची भीती असल्याने कारंडे यांनी जोराने चोर म्हणून ओरडा केला. ते त्रिकुटाच्या तावडीतून निसटले. कारंडे यांचा आवाज ऐकून मालगाडी थांबा भागातील गस्तीवरील रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे साध्या वेशातील पोलीस धावून आले. पोलिसांना पाहताच तीन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाऊ लागले, असे पोलिसांनी सांगितले.

कारंडे यांनी तिघांनी आपणास लुटले असल्याची माहिती जवानांना देताच साध्या वेशातील पोलीस आणि जवानांनी त्रिकुटाचा पाठलाग केला. पळताना चोरट्यांची दमछाक झाली. या संधीचा फायदा घेत लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा जवानांनी तिघा जणांना झडप घालून अटक केली. या तीन जणांनी आतापर्यंत लुटमार, चोरीचे किती गुन्हे केले आहेत याचा तपास सुरू करण्यात आला आहे. या तीन जणांवर कारंडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली.