ठाणे : कल्याण पूर्वेतील विजयनगर भागात दोन रेडी मिक्सर वाहनांनी नऊ वाहनांना धडक दिल्याची घटना ताजी असतानाच, रविवारी मध्यरात्री ठाण्यातील पूर्व द्रुतगती महामार्गावर तीन वाहनांची एकमेकांना धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये एका कारचा चुराडा झाला आहे. या अपघातात कारमधील सहा जण जखमी झाले असून त्यामध्ये लहान मुलांचा सामावेश आहे. त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे मुख्य मार्गावरील वाहतुक सुमारे एक तास बंद होती. येथील वाहतुक सेवा रस्त्याने सोडण्यात आली. त्यामुळे काही काळ वाहतुक कोंडी झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल जावळे (३६), स्वाती जावळे, ( ३५), स्वरा जावळे (१२), शांभवी जावळे, (१), प्रियंका विजय बागुल (३८) आणि शौर्य विजय बागुल (१६) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्वजण रविवारी मध्यरात्री कारमधून प्रवास करत होते. ते मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी भागातून वाहतुक करत होते. त्याचवेळी एक माती वाहून नेणारा डम्पर मुलुंड चेकनाका येथून कशेळीच्या दिशेने वाहतुक करत होता. या डम्पर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा डम्पर एका मालवाहू ट्रकला आदळला. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून तो ट्रक समोरील जावळे यांच्या कारला आदळला. हा अपघात इतका भीषण होता की, त्यांच्या कारचा अक्षरश: चुराडा झाला.

घटनेची माहिती वाहतुक पोलिसांना मिळाल्यानंतर राबोडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, वाहतुक पोलीस, ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना मदत कार्य सुरू केले. दरम्यान, कारमध्ये राहुल आणि स्वाती हे अडकले होते. पथकाने त्या दोघांना कारमधून बाहेर काढले. सर्व जखमींना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य सुरु असल्याने कॅडबरी उड्डाणपूलावरून घोडबंदर, भिवंडीच्या दिशेने वाहतुक करणारी वाहिनी एक तास बंद ठेवण्यात आली होती. येथील वाहनांना सेवा रस्त्याने वाहतुक करावी लागली. त्यामुळे वाहतुक कोंडी झाली होती. शनिवारी देखील कल्याणमध्ये अशाचप्रकारे भीषण अपघात झाला होता. कल्याण येथील विजय नर भागात पुना जोड रस्त्यावर शनिवारी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या दरम्यान दोन रेडी मिक्सर वाहनांनी नऊ वाहनांना धडक देऊन चिरडले. सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three vehicles collided head on eastern expressway in thane on sunday midnight sud 02