मुलीच्या लग्नास ११ वर्ष उलटूनही बाळ होत नसल्याने एका वृद्धेने पाच वर्षीय मुलाचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कळवा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या मदतीने अवघ्या ४८ तासात मुलाचा शोध घेऊन त्याला त्याच्या आईकडे सुपूर्द केले आहे. मुलाला पाहताच महिलेचे अश्रू अनावर झाले. याप्रकरणी पोलिसांनी उषा साळवे (६०) आणि तिची मुलगी आरती यादव (३०) हिला अटक केली आहे.
कळवा येथील शांतीनगर भागात ३० वर्षीय महिला ही तिच्या पाच वर्षीय मुलासोबत राहते. ही महिला कळवा शहरात कचरा वेचक म्हणून काम करते. शनिवारी रात्री ८ वाजता महिला ही कळवा स्थानक परिसरात आली होती. त्याचवेळी या महिलेचा पाच वर्षीय मुलगा तिच्या शोधात स्थानक परिसरात आला होता. महिला रात्री घरी परतल्यानंतर तिला मुलगा दिसला नाही. महिलेने त्याचा शोध घेतला परंतु त्याचा शोध लागला नाही. अखेर दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी दुपारी ३.३० वाजता महिलेने कळवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे कळवा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी याप्रकरणाच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक जितेंद्र कुंवर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार केली. पोलिसांनी सर्वप्रथम कळवा शहरातील आणि रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळेस महिला ही कळवा स्थानकात अपहृत मुलाला घेऊन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाडीत चढत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ ठाणे रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावेळी तेथील सीसीटीव्ही चित्रीकरणात महिला ठाणे स्थानकात उतरल्याचे आढळून आले. तसेच ती चेंदणी कोळीवाड्याच्या दिशेने जाताना आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी चेंदणी कोळीवाडा येथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले त्या चित्रीकरणात महिला एका शेअर रिक्षामध्ये बसून काल्हेर भागात निघून गेल्याचे आढळले.पोलिसांनी पुन्हा तिच्या परतण्याचा मार्ग तपासला. त्यावेळी ती महिला कळवा येथील न्यू शिवाजीनगर परिसरात राहत असल्याचे समोर आले. पोलिसांचे पथक तिच्या घरी पोहचले. परंतु तिच्या घराला कूलूप होते. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील नागरिकांकडून महिलेचा मोबाईल क्रमांक प्राप्त केला. तसेचे तिची माहिती काढली. त्यावेळी तिचे नाव उषा असल्याचे समोर आले. पोलिसांनी तिचा कॉल तपशील प्राप्त करून घोडबंदर येथील मानपाडा भागातून तिला ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिने अपहृत मुलाला काल्हेर येथे राहणारी मुलगी आरती हिच्याकडे ठेवल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरतीकडून मुलाला ताब्यात घेतले. तसेच तिलाही अटक केली. मुलगा पुन्हा भेटल्याने त्या महिलेचे अश्रू अनावरण झाले होते.
आरती हिच्या लग्नास ११ वर्षे उलटून गेली होती. परंतु तिला बाळ होत नव्हते. त्यामुळे उषा हिने आपल्या मुलीसाठी एखाद्या मुलाचे अपहरण करण्याचे ठरवले होते. अखेर शनिवारी रात्री उषा हिने कळवा स्थानक गाठले. तिथे पाच वर्षीय मुलगा एकटाच होता. ही संधी साधत तिने मुलाचे अपहरण केले.