scorecardresearch

मध्य रेल्वेच्या कळवा स्थानकात कडेकोट पोलीस बंदोबस्त; प्रवाशांनी गोंधळ घालू नये म्हणून रेल्वे प्रशासनाची खबरदारी 

गर्दीच्या वेळेतील साध्या लोकल रद्द करून त्याजागी वातानुकूलित लोकल चालविल्या जात असल्याने चार दिवसांपूर्वी कळवा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी एकत्र येत मुंबईच्या दिशेने जाणारी एसी लोकल रोखून धरली होती.

मध्य रेल्वेच्या कळवा स्थानकात कडेकोट पोलीस बंदोबस्त; प्रवाशांनी गोंधळ घालू नये म्हणून रेल्वे प्रशासनाची खबरदारी 
मध्य रेल्वेच्या कळवा स्थानकात कडेकोट पोलीस बंदोबस्त

आंदोलन चिरडण्यासाठी बंदोबस्त असल्याची जितेंद्र आव्हाडांची टीका

ठाणे – गर्दीच्या वेळेतील साध्या लोकल रद्द करून त्याजागी वातानुकूलित लोकल चालविल्या जात असल्याने चार दिवसांपूर्वी कळवा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी एकत्र येत मुंबईच्या दिशेने जाणारी एसी लोकल रोखून धरली होती. तर याच कारणामुळे सोमवारी बदलापूर येथे प्रवाशांनी रेल्वे स्थानक व्यवस्थापन कार्यालयाबाहेर निदर्शने केली.  प्रवाशांनी गोंधळ घालू नये  यासाठी रेल्वे पोलिसांकडून  गेल्या दोन दिवसांपासून कळवा रेल्वे स्थानकात सकाळी ७ ते ९ या  वेळेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला जात आहे. तर प्रवाशांचे आंदोलन चिरडण्यासाठी हा बंदोबस्त तैनात करण्यात येत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

ठाणे, डोंबिवली, कल्याण, कर्जत या  भागातून लाखो प्रवासी मुंबईत कामानिमित्ताने उपनगरीय रेल्वेगाड्यांतून मुंबईत येत असतात. ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे लोकार्पण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने या मार्गिकेवर रेल्वे प्रशासनाने वातानुकूलीत रेल्वेगाड्याच्या फेऱ्या वाढविल्या होत्या. याध्ये साध्या उपनगरीय रेल्वेगाड्याच्या बहुतांश फेऱ्या रद्द करून त्याऐवजी वातानुकूलीत रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या साध्या लोकल गाड्या या गर्दीच्या वेळेत  आणि प्रवाशांच्या सोयीच्या असल्याने प्रवाशांकडून रोष व्यक्त केला जात आहे. प्रवाशांच्या या संतापाचा उद्रेक गेल्या शुक्रवारी कळवा रेल्वे स्थानकात पाहायला मिळाला. कळवा रेल्वे स्थानकात प्रवाशांना सकाळच्या वेळेत रेल्वेगाडीमध्ये चढणे शक्य नसते. त्यामुळे कळवा कारशेडमधून सकाळी सात नंतर ठाण्याच्या दिशेने सुटणाऱ्या काही सामान्य लोकल गाडीतून  कळव्यातील प्रवासी बसून प्रवास करतात.  परंतु यातील एक  सामान्य लोकल रद्द करून त्याऐवजी वातानुकुलीत लोकल शुक्रवारी चालविण्यात आली. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी वातानुकूलित रेल्वे रोखून आंदोलन केले होते. तर याच पद्धतीने  मुंबईहून सायंकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी सुटणारी बदलापूर लोकल वातानुकूलित केल्याने  प्रवाशांनी सोमवारी बदलापूर रेल्वे स्थानक व्यवस्थापन कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येनं निदर्शने केली. कळवा येथे प्रवाशांनी रेल रोखो आंदोलन केल्याने परिणामी मध्य रेल्वेचे वेळापत्रक काही काळ बिघडले होते. तसेच एसी लोकल रद्द नाही केल्यास काही प्रवाशी संघटनांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून रेल्वे पोलिसांच्या वतीने कळवा रेल्वे स्थानकात मागील दोन दिवसांपासून  सकाळी ७ ते ९ या वेळेत कडेकोट बंदोबस्त करण्यात येत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश निर्माण होऊ नये आणि लोकल सेवा सुरळीत राहावी यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडुन देण्यात आली आहे. मात्र या पोलिस बंदोबस्ताच्या विरोधात काही प्रवाशी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.

जनता शांत बसणार नाही – जितेंद्र आव्हाड

लोक न्याय हक्कासाठी, आपल्या अधिकारासाठी लढत आहेत. लोकांना घाबरविण्यासाठी आणि गांधीवादी पद्धतीने होणारे आंदोलनं चिरडण्यासाठी म्हणून पोलिसी अतिरेक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे प्रशासनाच्या अंगावर उलटेल. जनता शांत बसणार नाही. अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाजमाध्यांतून केली आहे. रेल्वे प्रवाशांच्या  आंदोलनाचा हा विषय आव्हाड यांनी सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनातही  मांडला आहे.

रेल्वे प्रवाशांच्या समस्यांकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. प्रवाशी आपल्या मूलभूत मागण्यांसाठी कोणत्याही राजकीय पाठबळाशिवाय आंदोलन करत आहे. त्याकडे लक्ष देण्याऐवजी पोलिसांचा वापर करत रेल्वे प्रशासन दडपशाहीचा वापर करत आहे. लोकशाहीच्या दृष्टीने हे अत्यंत वाईट आहे.

– सिद्धेश देसाई, अध्यक्ष, कळवा – पारसिक प्रवासी संघटना

मराठीतील सर्व ठाणे न्यूज ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tight police presence kalwa station railway administration caution avoid confusion passengers ysh

ताज्या बातम्या