जिल्ह्यात कडेकोट बंदोबस्त ; शिवसैनिक, शिंदे समर्थक कार्यकर्त्यांत संघर्ष उफाळण्याची शक्यता

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य राखीव दलाच्या तीन तुकडय़ा आणि दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले आहे. 

thane security thane police
ठाणे पोलिसांचा सुमारे चार ते पाच हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात तैनात करण्यात आला आहे.

समाजमाध्यमांतून प्रसारित मजकुरावरही पोलिसांची नजर

ठाणे : राज्य विधानसभेत बहुमत चाचणी घेण्याचे राज्यपालांचे आदेश, गुवाहाटीला गेलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आणि एकनाथ शिंदे समर्थक आणि शिवसैनिक यांच्यात होत असलेले वाद या पाश्र्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी शिवसेनेच्या महत्त्वाच्या शाखा, मध्यवर्ती कार्यालय, शिवसेना नेत्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षाव्यवस्थेत वाढ केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य राखीव दलाच्या तीन तुकडय़ा आणि दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले आहे. 

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे समर्थक आणि शिवसेना असे दोन गट पडल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे समर्थकांनी ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये फलकबाजी सुरू केली आहे. कल्याणमध्ये शिवसैनिक आणि शिंदे समर्थकांमध्ये वादाचेही प्रसंग घडले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर पोलीसही कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दक्ष झाले आहेत.

ठाणे पोलिसांचा सुमारे चार ते पाच हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात तैनात करण्यात आला आहे. तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन तुकडय़ा, दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. ठाणे शहरातील शिवसेनेची तलावपाळी येथील मध्यवर्ती शाखा, जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या शाखा, लोकप्रतिनिधींची जनसंपर्क कार्यालये, संवेदनशील भाग, शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. यासह शहरात स्थानिक पोलिसांकडून गस्ती घातली जात आहे.  समाजमाध्यमांवरही शिंदे समर्थक आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवू लागले आहेत. त्यामुळे पोलिसांचे समाजमाध्यम विभाग तसेच स्थानिक पोलिसांकडून समाजमाध्यमे आणि स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वाहिन्यांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tight police security in thane over fear of shinde and uddhav supporters clash zws

Next Story
ठाणे : भिवंडीत २१ किलो गांजा जप्त
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी