scorecardresearch

कल्याणमध्ये ५० मशिदींच्या परिसरात पोलीस बंदोबस्त कडक; २९ मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी मशिदींसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा आदेश मनसे कार्यकर्त्यांना दिला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी मशिदींसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा आदेश मनसे कार्यकर्त्यांना दिला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात शांतता राखली जावी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून मशिदीच्या विश्वस्तांनी बुधवारी पहाटे भोंग्याविना अजानचा कार्यक्रम पार पाडला. यावेळी मुस्लीम समाजाने पोलिसांकडून देण्यात आलेल्या सूचनांचं पालन केलं.

अनुचित प्रकार टाळण्यासाठी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा परिसरातील ५० मशिदींसमोर मंगळवारी रात्रीपासून पोलीस बंदोबस्त, दंगल विरोधी पथके तैनात करण्यात आली आहेत. मागील काही दिवसांपासून मशिदींच्या विश्वस्तांच्या बैठका घेऊन त्यांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याप्रमाणे आठवडाभरापासून कल्याणमध्ये भोंग्याविना अजान दिल्या जात आहेत.

काही ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा वापर होत असेल तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आवाजाच्या मापन तीव्रतेप्रमाणे ध्वनीक्षेपकाचा अजानसाठी उपयोग करत आहेत, असं पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.‘सर्व मशिदींच्या विश्वस्तांनी शांतता राखण्यासाठी पोलीस यंत्रणेला साहाय्य करण्याची तयारी दाखवली आहे. विश्वस्तांनी शहरातील शांतता बिघडणार नाही यासाठी प्रयत्नशील राहू आणि सर्व प्रकारचे सहकार्य करू असं आश्वासन पोलिसांना दिलं आहे’, अशी माहिती महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली आहे.

२९ मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
धार्मिक तेढ टाळण्यासाठी आणि शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सावधगिरीचा उपाय म्हणून कल्याण, डोंबिवलीच्या साहाय्यक पोलीस आयुक्तांनी ५० हून अधिक मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मंगळवारी कारणे दाखवा नोटिसा पाठविल्या आहेत. यामधील २९ कार्यकर्त्यांना पोलिसांनी मंगळवारी रात्रीच ताब्यात घेतलं आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tight security at 50 mosques in kalyan 29 mns activists took in police custody rmm