वाहतूक नियंत्रण कक्षाकडून कोंडीचा अभ्यास

ठाणे : ठाणे शहरात अंतर्गत तसेच मुख्य मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे पोलिसांनी शहरातील सिग्नल यंत्रणेच्या वेळेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील रस्त्यावरील वाहनांची संख्या तसेच सिग्नल परिसरात होणाऱ्या कोंडीचे निरीक्षण करून हे बदल करण्यात येणार आहेत.

ठाणे शहरातील अंतर्गत तसेच मुख्य मार्गावरून हजारो वाहने ठाणे स्थानक, नवी मुंबई, मुंबई, नाशिक, भिवंडीच्या दिशेने जात असतात. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अंतर्गत तसेच मुख्य मार्गावर सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. मुख्य मार्गावरील काही सिग्नलवर तीन मिनिटे वाहनचालकांना थांबून राहावे लागते, तर काही अंतर्गत मार्गावर बसविण्यात आलेल्या सिग्नलवर वाहनचालकांना एक मिनिट थांबावे लागते. काही मार्गावर वाहनांची संख्या अधिक असल्यास सिग्नल परिसरात वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागतात.

 या रांगांमुळे चालकांना अनेकदा दोन वेळा एकाच सिग्नलवर खोळंबून राहावे लागते. सकाळच्या वेळेत अंतर्गत मार्गावर ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या ही अधिक असते. त्या तुलनेत ठाण्याहून माजिवडा, घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या कमी असते. रात्री नेमके विरुद्ध चित्र असते. जास्त वेळ सिग्नलवर खोळंबून राहावे लागण्याने अनेक वाहनचालकांकडून नियमांचेही उल्लंघन होत असते. हे प्रकार टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी मुख्य मार्गावरील तसेच शहरातील अंतर्गत मार्गावरील सिग्नलच्या वेळातील सेकंदांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 

बदल असे..

सिग्नलच्या वेळेमध्ये बदल करण्यासाठी मार्गावरील वाहनांची संख्या किती आहे, कोणत्या सिग्नलवर अधिक वेळ जातो. याचे निरीक्षण वाहतूक नियंत्रण कक्षाकडून केले जात आहे. सकाळी ६ ते ८, सकाळी ८ ते ११, सकाळी ११ ते दुपारी ४, दुपारी चार ते सायंकाळी ६, सायंकाळी ६ ते रात्री ११ अशा पद्धतीने वेळा ठरवून या सिग्नलवरील यंत्रणांत बदल केले जाणार आहेत.

ठाणे शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुख्य तसेच अंतर्गत मार्गावरील वाहन संख्येची माहिती, कोणत्या सिग्नलच्या भागात किती वेळ वाहतूक कोंडी होते, याचा अभ्यास केला जात आहे. त्यानुसार सिग्नलच्या वेळा बदलल्या जातील.

बाळासाहेब पाटील, उपायुक्त, वाहतूक पोलीस