कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेच्या टिटवाळा अ प्रभाग हद्दीत मागील दीड वर्षाच्या कालावधीत पूर्णपणे बंद असलेली बेकायदा चाळी, व्यापारी गाळ्यांची बांधकामे बेसुमार सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे या भागात आता मोकळ्या जागा राहिल्या नसल्याने भूमाफियांनी बल्याणी, बनेली परिसरातील डोंगर, टेकड्या तोडून पालिका आणि महसूल, वन विभागाला अंधारात ठेऊन या बेकायदा चाळी, व्यापारी गाळ्यांची उभारणी सुरू केली आहे. या बेकायदा बांधकामावर अ प्रभाग अतिक्रमण नियंत्रण, साहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांचे नियंत्रण राहिले नसल्याने टिटवाळा परिसरात बेकायदा चाळी उभारणीला जोर आला आहे.

मागील दीड वर्षाच्या काळात तत्कालीन अ प्रभाग साहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी टिटवाळा, मांडा, वासुंद्री, बनेली, बल्याणी, आंबिवली, मोहने परिसरात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू ठेवली होती. या सततच्या कारवाईने पाटील यांनी भूमाफियांचे पेकाट मोडले होते आणि त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या होत्या. गेल्या वर्षी पाटील यांची बदली झाली आणि त्यांच्या जागी जयवंत चौधरी यांनी साहाय्यक आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.

त्यानंतर टिटवाळा परिसरात पूर्ण ठप्प असलेली बेकायदा बांधकामे, यापूर्वी तोडलेली बेकायदा चाळींची बांधकामे भूमाफियांनी पुुन्हा उभी केली आहेत. बनेली, बल्याणी परिसरातील लहान मोठया टेकड्या जेसीबीने भुईसपाट करून, झाडे तोडून भूमाफिया बेकायदा चाळी उभारत आहेत. या चाळी सरकारी जमिनी, वन विभागाच्या आणि पालिकेच्या आरक्षित जागांवर उभारल्या जात आहेत. या बेकायदा चाळी उभारणीला काही स्थानिक राजकीय मंडळी आशीर्वाद देत आहेत.

अ प्रभाग साहाय्यक आयुक्त चौधरी आणि अतिक्रमण नियंत्रण पथकाचे या बेकायदा बांधकामांवर नियंत्रण नसल्याने भूमाफिया रात्रंदिवस कामे करून या बेकायदा चाळी उभारणीच्या कामात व्यस्त आहेत. या बेकायदा चाळींना पालिकेच्या मुख्य जलवाहिनींंवरून पाणी पुरवठा केला जातो.

महापौरांनी लक्ष द्यावे

या बेकायदा चाळींमधील घरे पाच ते आठ लाख रूपयांना विकली जात आहेत. या चाळींमध्ये तात्काळ रहिवास निर्माण करून पालिकेला कारवाईपासून रोखण्याचे भूमाफियांचे प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्या प्रकरणात अ प्रभागातील एका अधिकाऱ्याचा चालक या भूमाफियांशी स्नेहसंबंध निर्माण करून त्यांना पालिकेतर्फे आशीर्वाद देत असल्याच्या या भागातील नागरिकांच्या तक्रारी आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी या चालकाची एक दृश्यध्वनी चित्रफित भूमाफियांशी संवाद साधतानाची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती.

अडिच वर्षापूर्वी अ प्रभागातील एका साहाय्यक आयुक्ताने बेकायदा चाळींना आशीर्वाद देण्या बरोबर या चाळींना झटपट मालमत्ता कर लावण्याचा उद्योग केला होता. नंतर तो अधिकारी निलंबित झाला होता. टिटवाळा, बनेली, बल्याणी परिसरात बेकायदा चाळी सुरू असताना पालिका मुख्यालयातील एकही वरिष्ठ अधिकारी या बेकायदा चाळींच्या उभारणी आणि त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देत नसल्याने महापौर डाॅ. हर्षाली चौधरी-थविल यांंनी टिटवाळा, बल्याणी परिसरात पाहणी दौरा करून बेकायदा चाळी तातडीने तोडण्याचे आदेश देण्याची मागणी नागरिक करत आहेत.

आपण नुकतीच टिटवाळा भागात ५९ जोती तोडली. तक्रारी येतात त्याप्रमाणे बेकायदा चाळी तोडल्या जात आहेत. – जयवंत चौधरी साहाय्यक आयुक्त, अ प्रभाग