कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील अ प्रभाग क्षेत्रात टिटवाळा, बल्याणी, बनेली परिसरात गेल्या तीन ते चार वर्षात १ हजाराहून अधिक बेकायदा चाळी भूमाफियांनी स्थानिक राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने उभारल्या. या बेकायदा चाळींच्या माध्यमातून भूमाफियांनी गेल्या चार वर्षाच्या कालावधीत एकूण ७०० कोटीची उलाढाल केली असल्याची खात्रीलायक माहिती या क्षेत्रातील एका माहितगाराने दिली. या बेकायदा चाळींच्या माध्यमातून भूमाफियांकडून स्थानिक पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या खिशात सुमारे १२ कोटीचा मलिदा पडला असल्याचे वास्तव या माहितगाराने सांगितले.
या बेकायदा चाळी पालिकेची डोकेदुखी ठरल्या आहेत. या बेकायदा चाळींना पालिकेच्या मुख्य जलवाहिनींवरून चोरून पाणी पुरवठा, चोरून वीज पुरवठा घेतला जात आहे. या बेकायदा चाळींच्या माध्यमातून पालिकेला महसूल मिळत नाही. गेल्या आठवड्यात आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार पालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण पथकाचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या पुढाकाराने टिटवाळा, बल्याणी परिसरातील एक हजार बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू केली होती.
राजकीय पुढारी गब्बर
टिटवाळा, बल्याणी, बनेली, वासुंद्री रस्ता परिसरात गेल्या चार ते पाच वर्षात स्थानिक राजकीय पुढारी, गावगुंड आणि भूमाफिया यांनी संगनमत करून १ हजाराहून बेकायदा चाळी उभारल्या. या बेकायदा चाळी सरकारी, गुरचरण जमीन, वन विभागाची जमीन, काही खासगी जमिनी, पालिकेच्या विविध सुविधा भूखंडांवर उभारण्यात आल्या आहेत. माहितगाराने सांगितले, एक बेकायदा चाळ १२ खोल्यांची असते. एका खोलीमागे पालिकेच्या स्थानिक नियंत्रक अधिकाऱ्याला १० हजार रूपयांची ‘खुशी’ (प्रेमाची भेट) द्यावी लागते. अशाप्रकारे एका बेकायदा चाळीतून नियंत्रक पालिका अधिकाऱ्याला १ लाख २० हजार रूपये मिळतात.
एक खोली भूमाफिया घर खरेदीदाराला पाच ते सहा लाख रूपयांना विकतो. बेकायदा चाळीतील १२ हजार खोल्यांची विक्री करताना प्रत्येक खोलीमागे भूमाफिया, राजकीय पुढाऱ्यांना ६ लाख रूपये मिळाले. अशाप्रकारे या खोल्यांच्या माध्यमातून मागील चार वर्षात भूमाफियांनी, स्थानिक राजकीय पुढाकाऱ्यांनी सुमारे ७२० कोटीचा दौलतजादा केला. या खोल्यांच्या माध्यमातून स्थानिक नियंत्रक पालिका अधिकाऱ्याने १२ कोटीचा मलिदा खिशात घातला, असे माहितगाराने सांगितले.
बेकायदा चाळींना कर
मागील दोन वर्षापूर्वी बेकायदा चाळींना आशीर्वाद देऊन त्या उभारू दिल्या. त्या माध्यमातून मलिदा काढला. त्याच बरोबर या बेकायदा चाळींना घाईत मालमत्ता कर लावण्याचे धंदे अ प्रभागातील तत्कालीन काही साहाय्यक आयुक्तांनी केले. या बेकायदा चाळींना कर लागलेली सुमारे ११ हजाराहून अधिक प्रकरणे अ प्रभागात बेवारस स्थितीत पडून आहेत. या बेकायदा चाळी पालिकेने तोडून टाकल्या आहेत. त्यामधील खोल्या आता निष्पन्न होत नाहीत.
भूमाफिया अस्वस्थ
टिटवाळा, बल्याणी भागात गेल्या आठवड्यात कारवाई सुरू असताना एका स्थानिक राजकीय पुढारी धावत पालिका अधिकाऱ्यांसमोर हजर झाला होता. अनेक गैरव्यवहाराची प्रकरणे सतत बाहेर काढणारा हा पुढारी बल्याणीतील बेकायदा चाळींच्या विषयांवर अधिकाऱ्यांशी तुम्ही माझ्याच भागाला लक्ष्य का करता म्हणून हुज्जत घालत होता. या अधिकाऱ्याला स्थानिक पोलिसांची साथ मिळाली. अखेर पालिकेला कारवाई आवरता घ्यावी लागली.
कामगार पळाला
बल्याणीत कारवाई सुरू असताना अ प्रभागातील अतिक्रमण नियंत्रण विभागाचे कामगार दत्तू शेवाळे हे पालिका अधिकाऱ्यांना या चाळींवर कारवाई करू नका, तेथे जाऊ नका असे सल्ले देत होते. या चाळी उभारताना शेवाळे यांच्या या भागात फेऱ्या होत्या. कारवाई सुरू असताना नंतर शेवाळे तेथून गायब झाल्याची चर्चा होती.
