कल्याण – टिटवाळा मांडा परिसरात ९० फुटी रस्त्यालगतच्या नदी किनारच्या सागरी किनारा नियमन क्षेत्रात (सीआरझेड) बेसुमार बेकायदा बांधकामे सुरू आहेत. या बेकायदा बांधकामांमुळे टिटवाळा, मांडा भागातून पावसाळ्यात नदीत वाहून जाणारे पाणी अडून राहण्याची शक्यता आहे. थोड्याशा पावसातही या बेकायदा बांधकामांना पाणी अडून टिटवाळा, मांडा परिसर जलमय होण्याची भीती आहे. त्यामुळे सीआरझेड क्षेत्रातील बेकायदा बांधकामांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी मांडा टिटवाळा भागाचे नगरसेवक बंदेश जाधव यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे.
या बेकायदा चाळींचे बांधकामधारक गोरगरीब लोकांना कमी किमतीत घरे विकून निघून जातात. पण पावसाळ्यात ही घरे पुरामुळे, पावसामुळे जलमय होऊन या सामान्य लोकांचे नुकसान होते. घर खरेदीदाराला स्थानिक परिस्थितीची माहिती नसते. त्यामुळे पावसाळयात या बेकायदा घरांमध्ये घर खरेदी करणारा नागरिक फसतो. त्याची आर्थिक फसवणूक होते. नागरिकांची फसवणूक होण्यापूर्वीच ही बेकायदा चाळीतील घरे तोडून टाकवीत, अशी मागणी नगरसेवक जाधव यांनी आयुक्तांकडे केली आहे.
नगरसेवकांचा पुढाकार
पालिकेत प्रशासकीय राजवट होती. या कालावधीत टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामाच्या तक्रारी स्थानिक जागरूक नागरिक पालिकेत करत होते. आता नगरसेवक राजवट आली आहे. टिटवाळ्यात चार नगरसेवक विविध भागात सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे महापौरांचा प्रभाग या भागात आहे. त्यामुळे महापौरांसह स्थानिक नगरसेवकांनी आपल्या प्रभाग क्षेत्रात सुरू असलेली बेकायदा चाळी, इमारती, व्यापारी गाळ्यांची बांधकामे तातडीने जमीनदोस्त होण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
सक्षम अधिकारी नेमा
बेकायदा बांधकामांचा महापूर ज्या अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्या कालावधीत मागील सात ते आठ महिन्यांच्या कालावधीत आला, ते चौधरी आपल्या वैद्यकीय रजेवरून पुन्हा परतले आहेत. ते टिटवाळा अ प्रभागात साहाय्यक आयुक्त म्हणून हजर झाले आहेत. मालमत्ता वसुलीतील निष्क्रियतेवरून आयुक्त अभिनव गोयल यांनी काही दिवसापूर्वी साहाय्यक आयुक्त चौधरी यांना निलंबनाची नोटीस देऊन खुलासा करण्यास सांगितले होते. निलंबन नोटीस हाताच मिळताच चौधरी अस्वस्थ होऊन एका उपायुक्ताच्या दालनात बोलत असताना चक्कर होऊन पडले होते. त्यानंतर ते वैद्यकीय रजेवर गेले होते.
चौधरी यांच्यावर आयुक्तांची कारवाईची नोटीस आहे. त्यामुळे चौधरी यांना पुन्हा अ प्रभागात नेमणूक दिल्याने पालिकेत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पालिकेतील एक सर्वोच्च पदाधिकारी या पुनर्नियुक्तीमध्ये सहभागी असल्याची चर्चा आहे. अ प्रभागातील बेकायदा बांधकामांची खडानखडा माहिती असलेल्या ईस्माईल पठाण या कामगाराची एका पालिका पदाधिकाऱ्याच्या इशाऱ्यावरून अन्यत्र बदली करण्यात आल्याने पालिकेत पुन्हा ‘पदाधिकारी बदली राज’ सुरू झाल्याची चर्चा आहे.
बेसुमार बेकायदा
टिटवाळा परिसरात बेसुमार बेकायदा बांधकाम सुरू आहेत. टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळील एक गृहसंकुलालगत पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता संथगतीने बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारी पालिकेत काही नागरिकांकडून करण्यात आल्या आहेत. यापूर्वीसारखे चौधरी बेकायदा बांधकामे तोडण्याचे देखावे करतात की खरच ही बांधकामे भुईसपाट करतात याकडे तक्रारदारांच्या नजरा लागल्या आहेत.
