कल्याण : गणपती विसर्जन मिरवणुकीत तुमचा गणपती पुढे की आमचा पुढे, तुमच्या की आमच्या गणपतीचे अगोदर विसर्जन अशाप्रकारची चढाओढ करत, दणदणाटी आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करत, विसर्जन मिरवणुकीत दाेन गटात मारहाणीची घटना घडली. या पार्श्वभूमीवर टिटवाळा पोलिसांनी भाजप पदाधिकाऱ्यांसह दोन्ही गटातील एकूण ८० जणांच्या विरोधात शासन आदेशा भंग केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
टिटवाळा पोलीस ठाण्यातील अंमलदार योगेश निर्मळ यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भाजप नगरसेविका उपेक्षा शक्तिवान भोईर, भाजप पदाधिकारी शक्तिवान भोईर आणि त्यांचे ४० साथीदार, प्रदीप भोईर, सुरेश भोईर आणि त्यांचे ४० साथीदारांविरूध्द गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली. अंमलदार निर्मळ यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की टिटवाळ्यातील नगरसेविका उपेक्षा भोईर, शक्तिवान भोईर आणि त्यांचे समर्थक आपला पाच दिवसांचा गणपती घेऊन रात्री साडे आठ वाजता वाद्यवृंदासह
विसर्जनासाठी निघाले होते. भोईर यांच्या गणपतीची मिरवणूक पंचवटी, रेल्वे पुलावरून रिजन्सी सर्वम येथून श्रीकृष्ण रुग्णालय येथे रात्री सव्वा दहा वाजता आली. त्याचवेळी प्रदीप भोईर यांचा घरगुती गणपती विसर्जनासाठी मांडा येथून निघाला होता. प्रदीप भोईर यांचे समर्थक गणपती विसर्जनासाठी श्रीकृष्ण रुग्णालयापर्यंत मिरवणुकीतून पोहचले होते.
यावेळी प्रदीप भोईर यांच्या समर्थकांनी त्यांचे गणपती विसर्जन मिरवणुकीचे वाहन शक्तिवान भोईर यांच्या गणपती विसर्जन वाहनाच्या पुढे नेले. विसर्जन मिरवणूक रांगेत असताना त्यात मोडता घातल्याने शक्तिवान भोईर आणि प्रदीप भोईर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. आणि दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना शिवागाळ करत धक्काबुक्की करू लागले. हवालदार मदन शेलवले, द्वारकानाथ भगत यांनी दोन्ही गटांना दूर सारून वाद मिटवला.
न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन
– रात्रीचे दहा वाजल्याने शासन, न्यायालयाने दिलेली वाद्य वाजविण्याची मुदत संपल्याने पोलिसांनी दोन्ही गटांना मिरवणुकीत वाद्ये वाजविण्यास मनाई केली. या गोष्टीचा राग येऊन नगरसेविका उपेक्षा भोईर, शक्तिवान भोईर यांनी समर्थकांसह टिटवाळा एमएनएस चौकात रस्ता अडवून घोषणाबाजी सुरू केली.
– रस्ता अडवून नका असे सांगुनही ते पोलिसांचे ऐकत नव्हते. त्यानंतर त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता वाद्यवृंद वाजवत प्रदीप भोईर आणि शक्तिवान भोईर हनुमान तळे येथे आले. प्रदीप भोईर यांच्या गणेश मूर्तीचे मध्यरात्री सव्वा वाजण्याच्या दरम्यान विसर्जन झाले.
– त्यांच्या पाठोपाठ शक्तिवान भोईर यांच्या गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक हनुमान तळे येथे विसर्जनासाठी जात होती. प्रदीप भोईर, सुरेश भोईर आणि त्यांचे समर्थक विसर्जनानंतर घरी जाण्यास निघाले असताना, पुन्हा दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना शिवागाळ करत भिडले. शासनाने वाद्यवृंद वाजविण्याविषयी दिलेल्या आदेशाचा भंग केला. तसेच सार्वजनिक रस्ता अडवला म्हणून पोलिसांनी एकूण ८० जणांच्या विरूध्द गु्न्हा दाखल केला आहे.
