कल्याण – टिटवाळा गणेशवाडी भागात भूमाफियांनी टेकडी खोदून बेकायदा गाळ्यांची उभारणी केली होती. याविषयीच्या तक्रारी पालिका मुख्यालयातील वरिष्ठांना प्राप्त होताच वरिष्ठांच्या आदेशावरून टिटवाळा अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांनी हे गाळे जेसीबीच्या साहाय्याने तोडकाम पथकाच्या साहाय्याने मंगळवारी भुईसपाट केले.

टिटवाळा, मांडा, बल्याणी, बनेली भागातील मोकळ्या सरकारी, वन, पालिकेच्या आरक्षित जमिनी हडप केल्यानंतर आता बेकायदा चाळी, गाळे उभारणीसाठी मोकळया जागा राहिल्या नसल्याने भूमाफियांनी टिटवाळा गणेशवाडी भागात टेकडी खोदून बेकायदा गाळ्यांची उभारणी केली होती. मागील चार ते पाच दिवस रात्रंदिवस हे काम सुरू होते. या कामासाठी पालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून चोरून पाणी पुरवठा घेण्यात आला होता. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरांच्या अनेक भागात नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही आणि भूमाफिया मात्र बिनधास्तपणे चोरून पाणी वापरत असल्याने गणेशवाडी भागातील नागरिक तीव्र नापसंती व्यक्त करत होते.

टेकडी खोदून हे बेकायदा गाळे उभारले जात असताना पालिकेच्या अ प्रभागातील बीट मुकादम, साहाय्यक आयुक्त, कनिष्ठ अभियंत्यांना दिसत नव्हते का, असे प्रश्न स्थानिक रहिवासी करत होते. टेकडी खोदून आठ ते दहा गाळ्यांची उभारणी केल्यानंतर भूमाफियांनी आणखी वाढीव गाळे या भागात बांधण्याचे नियोजन केले होते. तत्पपूर्वीच या बेकायदा गाळ्यांविषयी पालिका आयुक्त अभिनव गोयल, अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्याकडे तक्रारी प्राप्त होताच, या दोन्ही अधिकाऱ्यांनी साहाय्यक आयुक्त चौधरी यांना तातडीने टिटवाळा गणेशवाडी भागात जाऊन संबंधित निर्माणाधिन असलेले बेकायदा गाळे तातडीने जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. वरिष्ठांचे आदेश असल्याने साहाय्यक आयु्क्त चौधरी यांनी विनाविलंब गणेशवाडी येथे जाऊन भूमाफियांचे बेकायदा गाळे जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले.

हे गाळे पूर्ण करून त्याठिकाणी तात्काळ दुकाने सुरू करण्याचे भूमाफियांचे नियोजन होते. या भागात अशाच प्रकारचे गाळे भूमाफियांनी बांधून ठेवले आहेत. टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांवर पालिका वरिष्ठांची करडी नजर आहे. त्यामुळे टिटवाळ्यात कुठेही बेकायदा बांधकाम सुरू असले की ते पहिले पालिकेच्या अ प्रभाग अधिकारी, कर्मचाऱ्यांना समजण्यापूर्वी त्याची पक्की माहिती पालिका मुख्यालयातील वरिष्ठांना समजते. हे अधिकारी स्थानिक अधिकाऱ्यांना कोणतीही गडबड करण्याची संधी न देता ते बेकायदा गाळे, बेकायदा चाळी जमीनदोस्त करण्याचे आदेश देत आहेत.

पालिकेचे अ प्रभागातील स्थानिक कर्मचारी भूमाफियांशी सलगी करून बेकायदा बांधकामांना पाठबळ देतात आणि पालिका मुख्यालयातील अधिकारी ती बेकायदा बांधकामे तातडीने भुईसपाट करण्याचे आदेश देत असल्याने स्थानिक अधिकारी, कामगार, खासगी वाहन चालक यांची मोठी कोंडी झाली आहे. हे बेकायदा गाळे जमीनदोस्त करण्यात येतील, असे साहाय्यक आयुक्त चौधरी यांनी सांगितले होते.