कल्याण – टिटवाळा, मांडा, बल्याणी, बनेली, वासुंद्री भागातील मोकळ्या सरकारी, वन आणि पालिकेच्या आरक्षणाच्या जमिनी बेकायदा चाळी बांधून हडप केल्यानंतर भूमाफियांना आता पुरेशी मोकळी जागा राहिली नसल्याने माफियांनी आता टिटवाळा भागातील लहान, मोठ्या टेकड्या जेसीबीच्या साहाय्याने खोदून तेथील वनसंपदा नष्ट करून तेथे बेकायदा चाळी, व्यापारी गाळे उभारणीस सुरूवात केली आहे.

टिटवाळ्यातील बेकायदा चाळींविषयी गेल्या वर्षभरापासून पालिका आयुक्तांकडे जागरूक नागरिक, नगरसेवक तक्रारी करत असुनही, या भागातील बेकायदा चाळी, गाळे उभारणीचे काम थांबत नसल्याने तक्रारदार, पर्यावरणप्रेमी नागरिक तीव्र नापसंती व्यक्त करत आहेत.

टिटवाळ्यातील गणेशवाडी भाग हा निसर्गरम्य भाग आहे. या भागात लहान मोठ्या टेकड्या आणि त्यावर गर्द झाडी आहे. परिसरातील नागरिक याठिकाणी सकाळ, संध्याकाळ फिरण्यास येतात. आता भूमाफियांचे विखारी डोळे या निसर्गरम्य टेकड्यांवर पडले आहेत. रात्री १० वाजल्यानंतर भूमाफिया जेसीबीच्या साहाय्याने या टेकड्यांचे लचके तोडून तेथे सपाट भाग करत आहेत. पहाटेपर्यंत टेकडीचा काही भाग जेसीबीने तोडून झाला की तेथे तात्काळ दगड, मातीचा भराव करून ती जागा भूमाफिया आपल्या ताब्यात घेत आहेत.

अशाच पध्दतीने गेल्या काही दिवसांपासून टिटवाळा गणेशवाडी भागात भूमाफियांनी दिवस, रात्र काम करून बेकायदा गाळे उभारणीचे काम सुरू केले आहे. या बांधकामांसाठी पालिकेच्या जलवाहिनीवरून चोरून पाणी पुरवठा घेतला जात आहे. या चोरीच्या पाणी पुरवठ्याविषयी स्थानिक नागरिकाने भूमाफियाला जाब विचारला की त्याला दादागिरी करून गप्प बसविले जाते. बेकायदा बांधकामांसाठी वापरण्यात येणाऱ्या या चोरीच्या पाण्यामुळे आजुबाजुच्या परिसराला कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.

टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामे हा कल्याण डोंबिवली पालिकेतील सर्वाधिक ज्वलंत आणि चर्चेचा विषय झाला आहे. गेल्या महिनाभराच्या काळात टिटवाळा भागात बेकायदा चाळी तोडण्याची मोठी मोहीम अतिक्रमण नियंत्रण उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी केली. त्याचा मोठा दणका भूमाफियांना बसला. एवढी कारवाई होऊनही भूमाफिया शांत बसत नसल्याने स्थानिक रहिवाशी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांविषयी स्थानिक नगरसेवक राहुल कोट यांनी अनेक पत्रे आयुक्त अभिनव गोयल यांना दिली आहेत. टिटवाळ्यात एक सक्षम साहाय्यक आयुक्त देण्याची त्यांची मागणी आहे. नैसर्गिक प्रवाह बदलून, टेकड्या खोदून आता टिटवाळ्यात बेकायदा बांधकामे सुरू झाल्याने पावसाळ्यात हलक्या पावसाने परिसर जलमय होण्याची भीती रहिवाशांना आहे.

टिटवाळा परिसरात एकूण ८४ भूमाफिया सक्रिय आहेत. या माफियांना टिटवाळा अ प्रभागातील काही कर्मचारी साथ देत असल्याने ते अशी बांधकामे करण्यास धजावत असल्याचे समजते. यामध्ये एका पालिका अधिकाऱ्याचा खासगी वाहन चालक सर्वाधिक सक्रिय असल्याची चर्चा आहे. टिटवाळ्यातील बेकायदा बांधकामांमधून मिळणाऱ्या दौलतजाद्यामधून अ प्रभागातील एका कामगाराने जेसीबी खरेदी केला. एका अधिकाऱ्याने आपल्या वाहनाचे कर्ज निर्लेखित केले. याच अधिकाऱ्याने रोखीने आपल्या मुलीसाठी एक सदनिका अंबरनाथमध्ये खरेदी केली. घरात नवे कोरे फर्निचर, प्रिय पत्नीसाठी लाखो रूपयांचे दागिने खरेदी केल्याची जोरदार चर्चा पालिका मुख्यालयात आहे. टिटवाळ्यातील एका अधिकाऱ्याला पालिकेतील एक सर्वोच्च पदाधिकारी आणि त्यांचा पतीराज आशीर्वाद देत असल्याची चर्चा आहे.

टिटवाळा गणेशवाडी भागातील बेकायदा गाळ्यांची पाहणी करून त्या तात्काळ तोडण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. याविषयी तक्रारी प्राप्त आहेत. ही बांधकामे तोडल्यावर आपणास तात्काळ कळवतो.- जयवंत चौधरी साहाय्यक आयुक्त,अ प्रभाग, टिटवाळा.