Dombivli Crime News: टिटवाळा येथील नांदप गावातील एका सराफाकडून डोंबिवलीच्या निखील भोईर यांनी जूनमध्ये सोन्याचे १८ लाख ९१ हजार रुपयांचे दागिने खरेदी केले. या सोने खरेदीचे शुल्क भोईर यांनी सराफाला धनादेशाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. तो धनादेश भोईर यांच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने वटला नाही. दोन महिन्यांपासून सतत तगादा लावूनही भोईर पैसे करत नसल्याने, संपर्काला प्रतिसाद देत नाही म्हणून सराफाने डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार केली.

पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घेतला आहे. फसवणूक करणारे निखील भोईर हे डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम रस्त्यावरील शांताराम व्हिला सोसायटीत राहतात. अरविंद एकनाथ शेलार (वय४२) असे टिटवाळा येथील सराफाचे नाव आहे. ते टिटवाळ्याजवळील नांदप गावात राहतात. त्यांचे टिटवाळ्यात ओम साई ज्वेलर्स नावाने सोने चांदी दागिने विक्रीचे दुकान आहे. सराफ अरविंद शेलार यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की निखील भोईर यांनी आपणास जूनमध्ये संपर्क करून आपल्या पत्नीस १२ तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या बनवायच्या आहेत. या पाटल्यांची काही संकल्पचित्र घेऊन आपण डोंबिवलीत माझ्या घरी या असे सुचवले. माझ्या मुलाच्या वाढदिवसासाठी आम्ही एकविरा येथे दर्शनासाठी जाण्याच्या गडबडीत आहोत. तुमचे सोने खरेदीचे पैसे मी तातडीने धनादेशाने देतो, असे आश्वासन भोईर यांनी सराफाला दिले. मोठे ग्राहक मिळाले म्हणून सोन्याच्या पाटल्यांची काही संकल्पचित्र, दागिने घेऊन आपल्या दुकानातील कामगार विनोद गोंधळी यांना आपण निखील भोईर यांच्या डोंबिवली पश्चिमेतील घरी पाठवले.

भोईर यांनी पाटल्यांचे एक संकल्पचित्र पसंत केले. तात्काळ १७ लाख ५० हजार रूपयांचा कोटक महिंद्र बँकेचा धनादेश भोईर यांनी गोंधळी यांच्या ताब्यात दिला. दुसऱ्या दिवशी निखील भोईर यांनी सराफ अरविंद शेलार यांना संपर्क करून माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. तुम्ही तात्काळ मला एक तोळ्याची सोन्याची साखळी घरी पाठवून द्या. मी तुम्हाला तात्काळ आरटीजीएस माध्यमातून शुल्क देतो असे सांगितले. निखील यांना सराफाने सोनसाखळीचे संकल्पचित्र पाठविले. पसंत पडलेली १० ग्रॅम वजनाची १ लाख ४१ हजार रूपये किमतीची सोनसाखळी घेऊन गोंधळी यांनी निखील यांच्या घरी आणून दिली. सोनसाखळी स्वीकारल्यावर निखील यांनी आज बँकेच्या व्यवहारांमध्ये काही अडचणी आहेत. त्यामुळे मी तु्म्हाला उद्या पैसे देतो असे गोंधळी यांना सांगितले. ही माहिती गोंधळी यांनी दुकान मालक शेलार यांना दिली.

निखील यांनी शेलार यांना सांगितले, माझी बँकेतील व्यवहाराची मर्यादा संपली आहे. त्यामुळे मला आज पैसे पाठवता येत नाहीत. आपण तुम्हाला उद्या पैसे पाठवतो, असे आश्वासन दिले. सराफ शेलार यांनी भोईर यांनी दिलेला धनादेश बँकेत जमा केला. तो वटला नाही. सराफाने तात्काळ भोईर यांना ही माहिती दिली. त्यांनी आपण तुमचे सोने खरेदीचे पैसे रोखीने देतो असे सांगितले. शेलार दुसऱ्या दिवशी निखील यांच्या घरी आले. त्यावेळी ते घरात नव्हते. त्यांचे इतर कुटुंबीय घरात होते. निखील यांना सराफाने संपर्क केला. आपणास येण्यास उशीर होईल असे उत्तर त्यांनी दिले. बऱ्याच वेळानेही निखील घरी परतले नाहीत. त्यानंतर निखील यांना संपर्क केल्यानंतर ते पैसे देण्याचे फक्त आश्वासन देत होते.

काही दिवसांपासून त्यांनी आपल्या संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. त्यामुळे आपल्याकडून १८ लाख ९१ हजाराचे सोन्याचे दागिने खरेदी करून आपणास त्याचे शुल्क न देता भोईर यांनी फसवणूक केली म्हणून सराफ शेलार यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.