कल्याण – कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरातील खडवली, राया गाव हद्दीत भूमाफियांनी सरकारी, गुरचरण, गावठाण आणि खासगी जमिनींवर स्थानिक शासकीय यंत्रणा, महसूल, ग्रामपंचायत विभागाच्या परवानग्या न घेता उभारलेल्या बेकायदा चाळी, व्यापारी गाळ्यांची बांधकामे गुरूवारी कल्याण महसूल विभाग आणि टिटवाळा पोलीस यांच्या संयुक्त कारवाईने जमीनदोस्त केली.

या कारवाईत खडवली- राया रस्त्यावरील ९० बेकायदा बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केली. कल्याण तालुक्यातील खडवली, राया गाव हद्दीतून महामार्ग जात आहेत. टिटवाळा परिसराची वस्ती खडवली, राया गाव हद्दीत वाढत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील मुंबई, नाशिककडे जाण्यासाठी मधला मार्ग म्हणून नागरिक खडवली, राया, टिटवाळा भागात घर घेतात. या भागात बेकायदा चाळ, इमारतीत स्वस्तात घर मिळत असल्याने या भागाला नागरिकांची सर्वाधिक पसंती आहे.

खडवली, राया, खडवली ते टिटवाळा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सरकारी जमिनी, गुरचरण, गावठाण जमिनीवर मागील चार ते पाच वर्षात चार ते पाच हजार बेकायदा बांधकामे उभारली आहेत.

बांधकामे भुईसपाट

गेल्या काही महिन्यांपासून खडवली राया रस्त्याच्या दुतर्फा सरकारी जमिनी हडप करून भूमाफिया मोक्याच्या जागा बळकावत असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या निदर्शनास आले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी खडवली राया परिसरातील सर्व बेकायदा बांधकामे जमिनदोस्त करण्याचे आदेश कल्याणचे तहसीलदार विकास गारूडकर यांना दिले.

मागील एक वर्षापासून कल्याण तालुक्यातील शासकीय व खासगी जमिनीवरील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामांवर तहसील विभागाकडून तोडकाम कारवाई करण्यात आली. मौजे खडवली व मौजे राया गावातील अनधिकृत बांधकामाना तहसील कार्यालयामार्फत वेळोवेळी नोटीस देऊन त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. या सुनावण्यांच्यावेळी जमीन मालकी, बांधकाम उभारणीची कोणतीही अधिकृत कागदपत्रे भूमाफिया महसूल विभागाला सादर करू शकले नाहीत.

या कारवाईत तहसीलदार विकास गारूडकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवास तहसीलदार सत्यजित चव्हाण, नायब तहसीलदार नितीन बोबडे, मंडल अधिकारी दीपक गायकवाड, दर्शना भावे, प्रीती घुडे, चेतन पष्टे आणि टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे आणि १५० पोलीस सहभागी झाले होते. स्थानिक ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी,अग्निशामक दल, वैद्यकीय पथके यावेळी तैनात होती.

९० बांधकामे भुईसपाट

या कारवाईत ८५ व्यापारी गाळे जमीनदोस्त करण्यात आले. उर्वरित २५ गाळ्यांना उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश आहे. या कारवाईपूर्वी खडवली, रायातील १३६ बांधकामांना महसूल विभागाकडून नोटीस देण्यात आली होती. यामधील ६० बांधकामे तोडण्यात आली. ७६ बांधकामांना स्थगिती आहे. रायातील ४६ बांधकामांना नोटीस देण्यात आली. २९ बांधकामे तोडण्यात आली. १२ बांधकामांना उच्च न्यायालयाची स्थगिती आहे.

मौज खडवली, राया भागात यापुढे एकही अनधिकृत बांधकाम होणार नाही याची काळजी घेतली जाईल. या भागात विनापरवानगी बांधकाम दिसले की तात्काळ आवश्यक प्रक्रिया करून जमीनदोस्त केले जाईल. नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी अशा विनापरवानगी बांधकामात गाळा, घर खरेदी करू नये. – विकास गारूडकर तहसीलदार, कल्याण.