कल्याण – दिवाळी सणानिमित्त टिटवाळ्यातील निमकर नाका, स्वामी विवेकानंद चौक आणि बाजारपेठ परिसरात फटाके विक्रीचे स्टॉल उभारल्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. या परिसरात नागरिकांची, वाहन चालकांची तसेच पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. अशा गर्दीच्या ठिकाणी फटाके विक्री सुरू राहिल्यास वाहतूक कोंडीबरोबरच संभाव्य अग्निसुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे निमकर नाका, स्वामी विवेकानंद चौक आणि बाजारपेठ परिसरात फटाके विक्रीला कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने परवानगी देऊ नये, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी पालिकेकडे केली आहे. यासंदर्भात स्थानिक नगरसेविकेने नागरिकांची बाजू घेऊन पालिका प्रशासनाला पत्र दिले आहे.

टिटवाळा निमकर नाका, स्वामी विवेकानंद चौक नागरिकांच्या वर्दळीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर फटाके विक्रीचे मंच लागले तर दिवाळी सणाच्या काळात या रस्त्यावरून चालणे मुश्किल होईल. वाहने या कोंडीत अडकून पडून प्रवाशांचे हाल होतील. वर्दळीच्या रस्त्यावर काही दुर्घटना घडली तर अग्निशमन वाहन याभागात येणे शक्य होणार नाही, असे रहिवाशांनी सांगितले. या भागातील फटाके विक्रीला स्थानिक लोकप्रतिनिधींनीही विरोध दर्शवला आहे. टिटवाळा महोत्सव मैदान, मिश्रा कंपाउंड, गणेश मंदिर रोड, टिटवाळा पूर्व येथे फटाके बाजारासाठी प्रशस्त जागा उपलब्ध आहे. या ठिकाणी फटाके विक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा मिळण्याबरोबरच ग्राहकांसाठी वाहने उभी करण्याची व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळता येईल आणि नागरिकांनाही सुरक्षितपणे खरेदी करता येईल, असे सामाजिक कार्यकर्ते विजयभाऊ देशेकर यांनी सांगितले. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन पालिका प्रशासन टिटवाळ्यातील सर्व फटाके विक्रेत्यांना स्टॉल मिश्रा कंपाउंड येथील जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य

फटाके विक्रीशी संबंधित काही राजकीय मंडळी मात्र निमकर नाका, स्वामी विवेकानंद चौक भागात फटाके विक्री स्टाॅल लावण्यासाठी आग्रही असल्याने रहिवासी संतप्त आहेत. फटाके विक्रेत्यांच्या व्यवसायाला आमचा विरोध नाही. त्यांना व्यवसायासाठी चांगली जागा मिळावी, ग्राहकांना सुविधा मिळाव्यात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य मिळावे, एवढीच आमची भूमिका आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

मैदानात सर्व फटाके विक्रेत्यांना जागा उपलब्ध करावी

टिटवाळ्यात नागरीकरण झाले आहे. त्यामुळे वस्ती वाढल्याने बाजारपेठेचा आकार वाढला आहे. टिटवाळा रेल्वे स्थानक भाग, निमकर नाका, स्वामी विवेकानंद चौक, बाजारपेठ भागात फटाके मंच उभारले तर अभूतपूर्व वाहन कोंडी होऊन नागरिकांना चालणे मुश्किल होईल. याठिकाणी काही दुर्घटना घडली तर मोठा पेच उभा राहील. त्यामुळे पालिकेने एखाद्या मैदानात सर्व फटाके विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून द्यावी. – विजयभाऊ देशेकर सामाजिक कार्यकर्ते.