Titwala Mahaganapati Hospital CT Scan Facility: टिटवाळा येथील श्री महागणपती रुग्णालयाला सामाजिक कार्यकर्त्या लिना देवस्थळी यांनी सीटी स्कॅन सयंत्राची सुविधा उपलब्ध करून दिली. या सुविधेचा टिटवाळा शहर, ग्रामीण भागातील रुग्णांना सर्वाधिक उपयोग होणार आहे. या सीटी स्कॅन सुविधेचे उद्घाटन बुधवारी लिना देवस्थळी, हिंदुजा रुग्णालयाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद लेले यांच्या हस्ते करण्यात आले.

श्री महागणपती रुग्णालयात सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरात उपचारासाठी जावे लागत होते. आता ही सुविधा लिना देवस्थळी यांच्या प्रयत्नांमुळे टिटवाळ्यात श्री महागणपती रुग्णालयात उपलब्ध झाल्याने रुग्णालय प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. श्री. यशवंत देवस्थळी यांच्या नावाने हे सीटी स्कॅन केंद्र सुरू करण्यात आले आहे.

साध्या पध्दतीने केलेल्या या उद्घाटन सोहळा कार्यक्रमात बोलताना सामाजिक कार्यकर्त्या लिना देवस्थळी यांनी सांगितले, मागील १४ वर्षापूर्वी या रूग्णालयाला भेट देण्यास आले त्यावेळी श्री महागणपती रुग्णालयातील बहुतांशी कर्मचारी हा इतर ठिकाणाहुन राजीनामा देऊन याठिकाणी कार्यरत झाला होता. त्यावेळी ही नवखी मंडळी कसे रुग्णालय चालविणार असे वाटत होते. पण या सर्व मंडळींनी नागरिक, रुग्ण यांचा विश्वास संपादन करून ज्या पध्दतीने हे रुग्णालय चालविले, नावा रूपाला आणले त्याबद्दल खूप समाधान वाटते.

ही नवीन सुविधा त्यांना नक्कीच लाभदायी ठरेल. या कार्यक्रमात बोलताना प्रमोद लेले यांनी सांगितले, या रुग्णालयात सीटी स्कॅन सारखी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता रुग्णालय प्रशासन, डाॅक्टरांची जबाबदारी वाढली आहे. या सुविधेच्या माध्यमातून अधिकाधिक रुग्णांना कशी सुविधा मिळेल यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. तसेच यापुढे रुग्णालयात कॅथ लॅब कशी सुरू होईल यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत.

या उद्गघाटन कार्यक्रमाला क्रिएटिव्ह ग्रुप संचालित श्री महागणपती रुग्णालयाचे मुख्य परिचलन अधिकारी विक्रांत बापट, क्रिएटिव्ह ग्रुपचे सदस्य किशोर गवाणकर, अभिजीत जोशी, आनंद हरकरे, डाॅ. संकेत पाठारी, डाॅ. रितेश नायक, डाॅ.आतिष दीक्षित, डाॅ. प्राची दीक्षित, डाॅ. हितेंद्र चौधरी उपस्थित होते.

आमच्या रुग्णालयात सीटी स्कॅन सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांना वेळेवर उपचार देणे हे आमचे प्रथम कर्तव्य असणार आहे. ही यंत्रणा सुरू होताच, अपघातग्रस्त एक महिला डाॅक्टर, आणि अन्य दोन या सुविधेचा लाभ देण्यात आला. टिटवाळा शहराजवळून महामार्ग जातात. नियमित अपघात या रस्त्यावर होतात. अपघातग्रस्तांना सीटी स्कॅन यंत्रणा उपलब्ध नसल्याने कल्याण भागात न्यावे लागत होते.

आता श्री महागणपती रुग्णालयातच अपघात विभागाच्या जवळ सीटी स्कॅन यंत्रणा उपलब्ध झाल्याने अपघातग्रस्तांसह इतर रुग्णांवर तातडीने उपचार आणि निदान करणे शक्य होणार आहे, असे मुख्य परिचलन अधिकारी बापट यांनी सांगितले. अनाथाश्रम, वृध्दाश्रमातील रुग्णांना या सुविधेचा लाभ देण्याचे प्रयत्न केले जातील. माफक दरात हीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.