कल्याण – कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्यावेळी झालेल्या वादावादीचा राग मनात ठेऊन टिटवाळ्यात शनिवारी रात्री इंदिरानगर भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शेजुळ यांच्यावर तीन जणांनी कोयता, चाॅपरने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात शेजुळ यांच्या पाय, पोट आणि गुडख्याला गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्यांच्यावर टिटवाळ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीतील राग मनात धरून पूर्वनियोजित कट करून आपल्यावर तीन जणांनी हा हल्ला केला आहे, असा आरोप तक्रारदार रवींद्र शेजुळ यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत केला आहे. अर्जुन शर्मा आणि त्याचे इतर दोन साथीदार यांचा उल्लेख शेजुळ यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत केला आहे. शर्मा हा खासगी तांत्रिकी म्हणून काम करतो.

मिळालेली माहिती अशी, की रवींद्र शेजुळ हे संघर्ष रहिवासी संघटनेचे टिटवाळ्यातील पदाधिकारी आहेत. ते इंदिरानगर भागात राहतात. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान रवींद्र शेजुळ ग्लोबल चाळ भागातून पायी चालले होते. यावेळी दबा धरून बसलेल्या अर्जुन शर्मा आणि त्याच्या इतर दोन साथीदारांनी शेजुळ यांना थांबवून घेतले. आणि मला नवीन गॅस जोडणी हवी असे बोलणी सुरू केली. अर्जुनशी बोलत असतानाच शेजुळ यांच्या पाठीमागून एका अनोळखी इसमाने शेजुळ यांची गळपट्टी धरून त्यांना लाकडी दांडक्याने अचानक मारहाण सुरू केली. त्याच बरोबर अर्जुन याने जवळील कोयत्याने शेजुळ यांच्या पोटावर वार केले. हल्ला चुकवित असताना अर्जुनचा एक घाव शेजुळ यांच्या कानावर बसला. त्यामुळे तक्रारदाराच्या कानाला गंभीर दुखापत झाली. अन्य एकाने पाठीमागून शेजुळ यांच्यावर चाॅपरने हल्ला करून त्यांना जमिनीवर पाडण्याचा प्रयत्न केला.

लाकडी दांडक्याने एकाने शेजुळ यांच्या पायाच्या घोट्यावर फटके मारल्याने तक्रारदाराच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. आपल्या मित्राला मारहाण होत आहे म्हणून रवींद्र शेजुळ यांच्या मित्र नितीन शेजुळ यांच्या बचावासाठी पुढे आला. आणि इतर पादचारी यावेळी शेजुळ यांच्या बचावासाठी पुढे आले. त्यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले. या घटनेनंतर तक्रारदाराला तात्काळ टिटवाळा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलिसांनी शेजुळ यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्राथमिक तपासणी अहवाल दाखल करून घेतला. पोलीस उपनिरीक्षक ग्यानबा इंद्राळे याप्रकरणाचा तपास करत आहेत. सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असलेल्या शेजुळ यांच्यावर हल्ला झाल्याने इंदिरानगर परिसरातील रहिवाशांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविला आहे.