कल्याण: मागील अनेक वर्ष टिटवाळा मांडा परिसरात वाहतूक पोलीस नियुक्त नसल्याने या भागातील वाहन चालक मनमानी पध्दतीने रस्ते, पदपथ, मोकळ्या जागांवर, रेल्वे स्थानक भागात दुचाकी, चारचाकी वाहने उभी करून बेकायदा वाहनतळ निर्माण करत होते. यामुळे टिटवाळा रेल्वे स्थानक, शहर परिसरातील रस्ते नेहमीच वाहन कोंडीने गजबजलेले असायचे. ठाणे पोलीस आयुक्तालयाने टिटवाळ परिसरासाठी आठ वाहतूक पोलीस नियुक्त केले आहेत. या पोलिसांनी पदभार स्वीकारताच टिटवाळा परिसरातील बेकायदा वाहनतळ आणि दुचाकी, मोटार चालकांवर कारवाई सुरू केली आहे.

गेल्या आठवडाभरात वाहतूक पोलिसांनी टिटवाळा रेल्वे स्थानक परिसर, श्री सिध्दीविनायक मंदिराकडे जाणारे रस्ते, मांडा, टिटवाळा अंतर्गत भागातील रस्ते, गल्लीबोळातील दुचाकी वाहने, मोटारी, शहरातील मोकळ्या जागांवर अस्ताव्यस्त पध्दतीने उभ्या केलेल्या सुमारे १०० हून अधिक वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईतून घटनास्थळीच संबंधित वाहन मालक, चालकाला वाहतूक पोलीस ई चलन पाठवून दंड वसूल करण्याची प्रक्रिया पार पडत आहेत.

टिटवाळ्यात वाहतूक पोलीस तैनात झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. आपले वाहन कोठेही उभे करून निघून गेलेल्या वाहन मालकाला आपल्या मोबाईलवर बेशिस्तीने वाहन उभे केल्याच्या दंडात्मक रकमा ई चलान माध्यमातून मिळत असल्याने वाहन चालक, मालक हैराण झाले आहेत. वाहतूक पोलिसांकडून सुरू असलेल्या या दररोजच्या कारवाईने नागरिक मात्र समाधन व्यक्त करत आहेत.

टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात वाहनतळ नाही. त्यामुळे मुंबई, कसारा भागात नोकरीला जाणारे वाहन चालक टिटवाळा रेल्वे स्थानक भागातील रस्ते, पदपथ, इमारतींचे कोपरे, मोकळ्या जागांमध्ये आपली दुचाकी, चारचाकी वाहने उभी करून सकाळच्या वेळेत जात होते. कामावरून परतल्यावर ही वाहने घेऊन पुन्हा निघून जात होते. या वाहन मालकांना पालिका, वाहतूक विभागाकडून कोणताही दंड आकारला जात होता. त्यामुळे अनेक वाहन चालक मनमानी पध्दतीने रस्त्यांच्या कडेला वाहने उभी करत होते. आपला दर महिन्याचा वाहनतळावर पैसे भरण्याचा पैसा वाचतो, अशी गणिते वाहन मालक करत होते.

वाहतूक पोलीस टिटवाळा भागात तैनात झाल्यापासून बेशिस्तीने वाहने उभी करणाऱ्या वाहन चालकांची कोंडी झाली आहे. रस्त्यावर कोठेही वाहन उभे केली त्या वाहन मालकांना कार्यालयात पोहचल्यावर त्यांच्या मोबाईलवर वाहतूक विभागाकडून आपले वाहन आपण बेशिस्तीने उभे केले असल्याचे आणि दंडात्मक कारवाई केली असल्याचे लघुसंदेश पाठविले जात आहेत.

ठाणे ग्रामीण भागासाठी वाहतूक पोलीस नियुक्त नसल्याने ग्रामीण भागात वाहन कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शासन निर्देशाप्रमाणे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ठाणे ग्रामीणसाठी ४२ वाहतूक पोलीस नियुक्त केले आहेत. यामधील ८ पोलीस टिटवाळा विभागासाठी नियुक्त केले आहेत.

मागणीचे यश

टिटवाळा भागातील जागरूक नागरिक ॲड. जितेंद्र जोशी गेल्या काही वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा करून टिटवाळा शहर परिसरासाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नियु्क्त करावा म्हणून प्रयत्न करत होते. टिटवाळा शहर परिसराचे नागरीकरण झाले आहे. या भागातील लोकवस्ती वाढली आहे. रस्त्यावरील वाहनांची संख्या, शाळांची संख्या वाढली आहे. या भागातील वाढत्या अपघातांचा विचार करून टिटवाळा भागासाठी वाहतूक पोलीस नियुक्त करावेत अशी मागणी ॲड. जोशी शासनाकडे करत होते. अखेर या मागणीची दखल घेऊन शासनाने आठ पोलीस टिटवाळा शहरासाठी नियुक्त केले आहेत.