ठाणे : देशातील चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक असलेल्या टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडने २५ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. यशामुळे बँकेच्या चौफेर विस्ताराच्या प्रवासाला आणि आर्थिक स्थैर्याला अधिक बळकटी प्राप्त झाली आहे. या उल्लेखनीय टप्प्यानंतर बँक भौगोलिक विस्तार वाढविणे, डिजिटल सेवा अधिक सक्षम करणे आणि सर्व ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यावर भर देऊन पुढील वाटचाल करणार असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले.
टीजेएसबी सहकारी बँकेची स्थापन १९७२ मध्ये झाली. टीजेएसबी सहकारी बँकेने सहकारी क्षेत्रातील विश्वासनीय वित्तीय संस्था म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. सध्या बँकेचे सात राज्यांमध्ये १६५ शाखांचे विस्तृत जाळे असून, रिटेल, एमएसएमई आणि कॉर्पोरेट ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करत बँक ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सेवा पुरवत आहे.
टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडने २५ हजार कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण टप्पा सुयोग्य आर्थिक व्यवस्थापन आणि ग्राहक केंद्रित बँकिंग सेवांना दिलेले प्राधान्य यामुळे गाठला. बँकेच्या विस्ताराच्या वाटचालीत अध्यक्ष शरद गांगल आणि व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर यांच्या नेतृत्वासोबतच संचालक मंडळ आणि व्यवस्थापन मंडळाचे मार्गदर्शन लाभले.
बँकेने आपल्या ग्राहकांचा सातत्यपूर्ण विश्वास आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करत आहे. तसेच या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समर्पणाची आणि योगदानाची विशेष दखल घेत आहे.
२५ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाच्या उल्लेखनीय टप्प्यानंतर बँक भौगोलिक विस्तार वाढविणे, डिजिटल सेवा अधिक सक्षम करणे आणि सर्व ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यावर भर देऊन पुढील वाटचाल करणार असल्याचे बँकेने म्हटले आहे.
