ठाणे – संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आयोजित आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थांच्या जागतिक परिषदेत टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत भारतीय सहकार चळवळीचा ठसा उमटवला. त्यांच्या सहभागामुळे ठाणे आणि देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राचा जागतिक स्तरावर गौरव झाला आहे.
जागतिक सहकार क्षेत्राच्या इतिहासात भारतीय नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राचा बहुमान झाला. अमेरिका येथील न्यूयॉर्क शहरातील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात २८ आणि २९ मे रोजी आंतरराष्ट्रीय सहकारी संस्थांचे जागतिक चर्चासत्र पार पडले. या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडचे अध्यक्ष शरद गांगल यांना मिळाला.
इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह अलायन्स अंतर्गत कार्यरत असलेल्या इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकिंग असोसिएशन यांच्यावतीने या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत आयसीएने शरद गांगल यांना विशेष निमंत्रण देऊन या परिषदेसाठी आमंत्रित केले होते. या परिषदेत जनता सहकारी बँक, पुणेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब यांचाही सहभाग होता.
सर्वसमावेशक आर्थिक वृद्धी’हा या परिषदेचा मुख्य विषय होता. दोन दिवस चाललेल्या या परिषदेत सहकारी बँका आणि क्रेडिट युनियन्सच्या माध्यमातून शाश्वत वित्तीय व्यवस्था उभारणे, आर्थिक समावेशन वाढविणे आणि सहकारातून समताधिष्ठित विकास साधणे या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना आर्थिक बळकटी देणे, शेतकरी व महिला उद्योजकांसाठी नाविन्यपूर्ण वित्तीय योजना राबविणे, समाजातील वंचित व दुर्बल घटकांना मुख्य आर्थिक प्रवाहात आणणे तसेच मध्यम वर्गीयांच्या घराच्या स्वप्नपूर्तीसाठी सुलभ गृहकर्ज सुविधा उपलब्ध करून देणे या विषयांवर परिषदेत विशेष भर देण्यात आला.
याशिवाय संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात जागतिक धोरणांवर चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय नागरी सहकारी बँकिंग कार्यप्रणालीची अधिकृत नोंद घेतली गेली. या परिषदेत संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी सुसंगत समाजाभिमुख वित्तीय प्रणाली विकसित करण्यासाठी जगभरातील तज्ज्ञांनी धोरणात्मकचर्चा केली. या चर्चासत्रात शरद गांगल यांनी भारतीय सहकारी चळवळीचे कार्य, तिची सामाजिक बांधिलकी आणि आर्थिक विकासातील भूमिका प्रभावीपणे मांडली.
