ठाणे महापालिकेचा आज अर्थसंकल्प

निवडणुकांमुळे लांबलेल्या ठाणे महापालिकेच्या आगामी वर्षांच्या अर्थसंकल्पास अखेर मुहूर्त मिळाला असून गुरुवारी सकाळी आयुक्त संजीव जयस्वाल तो सर्वसाधारण सभेपुढे सादर करणार आहेत. राज्य सरकारने कर वसुलीचे १०० टक्के उद्दिष्ट गाठण्याची तंबी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली असताना गुरुवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेस या आघाडीवर किती मजल गाठता आली हेदेखील स्पष्ट होणार आहे. दरम्यान, येत्या वर्षांच्या अर्थसंकल्पात शहराचा पुढील पाच वर्षांच्या विकासाचा आराखडा सादर केला जाण्याची शक्यता असून त्यामध्ये करवाढीची चिन्हेही कमी आहेत.

ठाणे महापालिका आयुक्त म्हणून जयस्वाल यांचा हा तिसरा अर्थसंकल्प असून गेल्यावर्षी आखण्यात आलेले महत्त्वाचे प्रकल्प प्रगतीपथावर अथवा निविदा प्रक्रियेत असल्याने येत्यावर्षी आणखी कोणत्या प्रकल्पांचा समावेश या अर्थसंकल्पात केला जातो याविषयी महापालिका वर्तुळात उत्सुकतेचे वातावरण आहे. गेल्या वर्षभरात शहरात रस्ते रुंदीकरण कामाचा धडाका अभियांत्रिकी विभागाने लावला आहे. याशिवाय कळवा येथील चौपाटी प्रकल्पाची आखणी महापालिकेने केली असून येत्या काळात यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. महापालिका निवडणुकांनंतर जयस्वाल यांच्या बदलीची चर्चा जोरात सुरू झाली आहे. जयस्वाल यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या अंमलबजावणीचे हे वर्ष असल्याने राज्य सरकार त्यांना हे प्रकल्प साकारण्याची संधी देते किंवा त्यापूर्वीच त्यांची बदली होते हेदेखील पाहाण्यासारखे ठरणार आहे. त्यामुळे गुरुवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कोणत्या नव्या प्रकल्पांचा समावेश जयस्वाल करतात याविषयी उत्सुकता आहे.