रुग्ण आणि नातेवाईकांना होणार ‘पुस्तकांची साथसंगत’

ठाणे : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात मोफत वाचनालय उभारण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे. या उपक्रमामुळे रुग्णालयात डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय यांच्यासह रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना ‘पुस्तकांची साथसंगत’ मिळणार आहे. या वाचनालयामुळे रुग्णांना धीर देण्यासाठी, मानसिक आधार देण्यासाठी रुग्णालयात उपस्थित असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना वेळेचा सदुपयोग करणे शक्य होणार आहे. या रुग्णालयापाठोपाठ टप्याटप्याने महापालिकेच्या इतरही आरोग्यकेंद्रात वाचनालये सुरू करण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरु आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> हिम्मत असेल तर माझ्यासमोर नगरसेवकांची निवडणुक लढा; नरेश म्हस्के यांनी दिले आदित्य ठाकरेंना खुले आव्हान

वाचनालयाचा उपक्रम हा ‘लेटस् रीड इंडिया’ या फाऊंडेशनच्या यांच्या मदतीने राबविला जात आहे. वाचनसंस्कृतीचा प्रसार व्हावा यासाठी लेटस् रीड फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यभरात विविध उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्यांच्या सहकार्यांने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वाचनालयाची उभारणी केली जाणार असल्याचे आयुक्त बांगर यांनी सांगितले. या रुग्णालयात गोरगरीब, मध्यमवर्गीय कुटुंबातील रुग्ण हे विविध उपचारांसाठी येतात. या ठिकाणी दररोज बाह्य रुग्ण कक्षात येणाऱ्या रुग्णांची संख्या ही साधारणत: पंधराशेच्या आसपास आहे. त्यामुळे उपचारासाठी रुग्णांना आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकाला नंबर येईपर्यत तसेच उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या सोबत असलेल्या व्यक्तींच्या वेळेचा सदुपयोग होण्यासाठी वाचनालयाचा निश्चितच उपयोग होणार आहे. तसेच उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचा बरे होऊन घरी जाण्याचा कालावधी हा पाच ते सात दिवसांचा असतो. अशा रुग्णांसाठी कक्षात स्वतंत्र वाचनालय असणार आहे, असेही बांगर यांनी सांगितले.

हेही वाचा >>>बेकायदा बांधकामांच्या पाडकामाचे अहवाल देण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे आदेश; अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाईचा बडगा?

रुग्णांसाठी नव्हेतर रुग्णालयात काम करणाऱे डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय, आया यांच्यासाठीही वेगळे वाचनालय असणार आहे. या वाचनालयात वैद्यकीय क्षेत्रातील घडामोडी, रुग्णालय व्यवस्थापन यांच्याशी संबंधित मासिके आणि पुस्तके उपलब्ध असतील. रुग्णांची मानसिकता सकारात्मक राहील, अशा पध्दतीने पुस्तकांची निवड केली जाणार आहे. पुस्तकांच्या निवडीमध्ये बहुभाषिक पुस्तके, सकारात्मक विचार- प्रसार करणारी पुस्तके, विनोदी पुस्तके, स्वत:ची काळजी कशी घ्यावी (सेल्फ हेल्थ) अशी माहितीपर पुस्तके ठेवली जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. ‘पुस्तके सांगतात गोष्टी युगायुगाच्या..’ ‘वाचाल तर वाचाल’ पण आजच्या धावपळीच्या जगात पुस्तके वाचण्यास वेळ मिळत नाही. अनेकांना आर्थिक परिस्थितीअभावी पुस्तके विकत घेणे परवडत नाही. यासाठी सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ही संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येत असून टप्याटप्याने महापालिकेच्या इतरही आरोग्य केंद्रात वाचनालये सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही त्यांनी सांगितले.

शहराची उंची ही त्या शहरातील उत्तुंग इमारतीवरुन नाहीतर त्या शहरातील ग्रंथालये, वाचनसंस्कृती यावरुन ठरत असते. ठाणे शहरात दीडशे वर्षाचे नगरवाचन मंदिर, शंभरी पार केलेले मराठी ग्रंथ संग्रहालय अशी वाचनालये आहे. परंतु अनेक नागरिकांना वाचनालयात जावून पुस्तक विकत घेवून वाचणे हे परवडणारे नसते. किंबहुना गोरगरीब नागरिकांना वाचनाची आवड असूनही त्यांना मुरड घालावी लागते. रुग्णालयात येणारे रुग्ण हे आजारामुळे चिंतेत असतात, या रुग्णांना काही अंशी दिलासा मिळावा व त्यांचा वेळ सत्कारणी लागावा यासाठी रुग्णालयात वैचारिक कोपरा सुरू करण्यात येणार आहे. आकर्षक स्वरुपात वाचनालयाची मांडणी करणार असल्यामुळे  रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येकाला या वाचनालयात जावून पुस्तक चाळावेसे वाटेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmc commissioner decision to set up a free library at chhatrapati shivaji maharaj hospital in kalwa zws
First published on: 07-02-2023 at 18:37 IST