ठाणे – विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांची, जबाबदाऱ्यांची आणि कायदेशीर संरक्षणाची माहिती व्हावी या उद्देशाने टीएमसी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ठाणे जिल्ह्यात कायदेविषयक जनजागृती उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत हजारहून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधून महिला व बालकांच्या संरक्षणाशी संबंधित महत्त्वाच्या कायद्यांची माहिती देण्यात आली. टीएमसी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कायदेविषयक जनजागृती उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी चार शाळा आणि दोन महाविद्यालयांमधील एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, २०१३’ या कायद्यावर जनजागृतीपर सत्र घेण्यात आले. या उपक्रमात विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी नितीन कांबळे, प्रशांत रघतवान, मनोज सोलसकर, धर्मादास मोहिते, ओमकार मळवदे, अक्षय जाधव, नीलकुमार मिटकरी, जुई पाटील, कोमल साजेकर, सेजल म्हात्रे, अनन्या चौहान आणि ह्रितिका चौधरी यांनी सक्रिय सहभाग घेतला. प्रश्नोत्तर, चर्चा, उदाहरणे आणि विविध संवादात्मक कृतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कायद्याची माहिती देण्यात आली.

विद्यार्थ्यांशी कायदेविषयक संवाद साधण्याबाबत मार्गदर्शन

लैंगिक छळ म्हणजे काय, त्याचे विविध प्रकार, कार्यस्थळी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरणाचे महत्त्व, तक्रार निवारणाची प्रक्रिया तसेच अंतर्गत तक्रार समितीची भूमिका याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम, २०१२’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श, बाल लैंगिक अत्याचार, फसवणूक करून मुलांचा विश्वास संपादन करण्याच्या पद्धती, इंटरनेटवरील सुरक्षितता तसेच एखादी अनुचित घटना घडल्यास किंवा संशय आल्यास विश्वासू व्यक्तीशी बोलणे आणि योग्य ठिकाणी तक्रार करणे याबाबत विद्यार्थ्यांना समजेल अशी माहिती देण्यात आली. उपक्रमाचे नेतृत्व अनुभवी सामाजिक कार्यकर्ते आणि विधीचे शिक्षण घेणारे ओनिल कुलकर्णी यांनी केले. सामाजिक कार्याचा अनुभव आणि कायद्याच्या अभ्यासाची सांगड घालत त्यांनी विद्यार्थ्यांच्या विषयाची मांडणी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या पद्धतीबाबत मार्गदर्शन केले.