scorecardresearch

जैव वैद्यकीय कचरा विल्हेवाटीसाठी नव्या ठेकेदाराचा शोध सुरु; महापालिकेने काढल्या निविदा

हा प्रकल्प नियमानुसार तसेच प्रदुषणकारी असल्याचा आरोप करत लोकप्रतिनिधींनी त्यास मुदत वाढ दिली नव्हती.

TMC Search for a new contractor for biomedical waste disposal
ठाणे महानगर पालिका (संग्रहीत छायाचित्र)

कळवा येथील महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय परिसरात जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प सुरु होता. हा प्रकल्प नियमानुसार तसेच प्रदुषणकारी असल्याचा आरोप करत लोकप्रतिनिधींनी त्यास मुदत वाढ दिली नव्हती. त्यातच हा प्रकल्प अद्ययावत करण्यासंबंधीचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नामंजुर केला होता. यामुळे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने मुंबई महानगर क्षेत्रात जैव वैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्टेवाट लावणाऱ्या संस्थेची निवड करण्यासाठी निविदा काढल्या असून ही निविदा प्रक्रीया दोन महिन्यात उरकण्याचे नियोजन पालिका प्रशासनाकडून आखण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

ठाणे महापालिका क्षेत्रात शासकीय तसेच खासगी रुग्णालयातून दररोज दोन टन जैव वैद्यकीय कचरा निर्माण होतो. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय परिसरात प्रकल्प उभारण्यात आला होता. इन्व्हायरो व्हिजिल संस्थेमार्फत हा प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पाबाबत लोकप्रतिनिधींकडून सातत्याने आरोप होत होते. यामुळे हा प्रकल्प काहीसा वादात सापडला होता. तसेच हा प्रकल्प नियमानुसार तसेच प्रदुषणकारी असल्याचा आरोप करत तो बंद करण्याची मागणीही लोकप्रतिनिधींनी सर्वसाधारण सभेत केली होती. या प्रकल्पाची मुदत ३० जून २०२१ संपुष्टात येणार होती. त्यामुळे मुदतवाढीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने नामंजुर केला होता. तर, हा प्रकल्प अद्ययावत करण्यासंबंधीचा प्रस्ताव इनव्हायरो व्हिजील संस्थेने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे अर्ज केला होता. मंडळने हा अर्जही नामंजुर केला होता. त्यामुळे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाने मुंबई महानगर क्षेत्रात जैव वैद्यकीय कचऱ्याची शास्रोक्त पद्धतीने विल्टेवाट लावणाऱ्या संस्थांची माहिती गोळा करून त्याद्वारे एका संस्थेची निवड करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यास सर्वसाधारण सभेची मंजुरीही मिळाली होती. त्यानुसार या विभागाने ठेकेदाराचा शोध घेण्यासाठी निविदा काढल्या आहेत.

 “ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय परिसरात जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणारा प्रकल्प सुरु होता. मात्र तो नव्या नियमावलीत बसत नव्हता. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रात जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या संस्थेची निवड करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. तसेच ठेकेदाराची निवड होईपर्यंत कळवा येथेच जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे,” असे ठाणे महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी म्हटले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tmc search for a new contractor for biomedical waste disposal abn

ताज्या बातम्या