ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीनंतर चार महिने उलटूनही प्रभाग विकास आणि सुधारणा निधी उपलब्ध होत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकाने महापौरांकडे आगळीवेगळी मागणी केली आहे. मानधन नको, आधी विकासनिधी द्या, अशा स्वरुपाची मागणी त्यांनी केली आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीनंतर चार महिने उलटूनही प्रभाग विकास आणि सुधारणा निधी उपलब्ध होत नसल्याने विकासकामांचा खोळंबा झाला आहे. नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक सुधीर भगत यांनी महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे. ठाणे महानगर पालिकेची सार्वजनिक निवडणुक पार पडुन चार महिने संपुष्टात आले आहेत. परंतु आजपर्यंत प्रभागातील कामे करण्याकरिता कुठल्याही प्रकारची प्रभाग विकास निधी आणि प्रभाग सुधारणा निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे प्रभागातील विकास कामे ठप्प झाली आहेत.
नागरिकांकडुन रस्ते, गटार, पाणी पुरवठा आणि अन्य मुलभुत सुविधांबाबत सातत्याने मागण्या होत असतांना त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने नगरसेवकांना नागरीकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अति आवश्यक कामे होत नसल्यामुळे प्रभागातील जनतेत आक्रोश निर्माण झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच शहरातील अनेक विकास कामांचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यामुळे आधी विकास निधी द्या, हवं तर नगरसेवकांचे मानधन रोखा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
