ठाणे परिवहन समितीच्या बैठकीत बस खरेदीचा प्रस्ताव मंजूर
ठाणे : महापालिका क्षेत्रातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा या उद्देशातून ८१ विजेवरील बस खरेदी करण्याचा निर्णय ठाणे परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार ९ आणि १२ मीटरच्या बस खरेदी करण्यात येणार असून त्यामध्ये ४१ वातानुकूलित तर ४० साध्या बस खरेदी करण्यात येणार आहेत. या बसच्या खरेदीसाठी टीएमटीला यापूर्वीच स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत केंद्र आणि राज्य शासनाकडून ३८ कोटींचा निधी मिळाला आहे.




ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यातील २७७ बस शहरातील ९८ मार्गावर चालविण्यात येत आहेत. त्यात टीमटीच्या स्वत: च्या ६७ बस आहेत. तर, उर्वरित जीसीसी तत्वावर ठेकेदारामार्फत चालविण्यात येणाऱ्या बसचा समावेश आहे. या बसच्या माध्यमातून टीएमटीला दररोज २१ ते २२ लाखांचे उत्पन्न मिळत आहे. शहरातील प्रवासी संख्येच्या तुलनेत टीएमटीच्या ताफ्यातील बस अपुऱ्या पडत आहेत. यामुळे या बसची संख्या वाढविण्यावर परिवहन समिती तसेच महापालिका प्रशासनाक़डून भर दिला जात आहे. ठाणे महापालिका प्रशासनाने यापूर्वी खासगी लोकसहभागातून टीएमटीच्या ताफ्यात शंभर विजेवरील बस घेण्याचा निर्णय घेतला होता. प्रत्यक्षात मात्र एकच बस दाखल होऊ शकली होती.
केंद्र आणि राज्य शासनाकडून स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत टीएमटीला विजेवरील बस खरेदी करण्यासाठी ३८ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. या निधीतून बस खरेदी करण्याचा प्रस्ताव परिवहन प्रशासनाने तयार करून परिवहन समितीपुढे मान्यतेसाठी सादर केला होता. २५ जानेवारी रोजी झालेल्या परिवहन समितीच्या सभेत सर्व सदस्यांनी चर्चा करून हा प्रस्ताव मंजूर केला. यामुळे बस खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती परिवहन सभापती विलास जोशी यांनी दिली.
उत्पन्नातही वाढ
ठाणे शहरातील ९८ पैकी ९५ टक्के मार्ग २० किमीपेक्षा कमी अंतराचे आहेत. उर्वरित मार्ग शहराबाहेरील असून ते २० किमीपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे शहरातील अंतर्गत मार्गावर साध्या बस चालविण्याचा तर बाहेरील मार्गावर वातानुकूलित बस चालविण्याचा विचार करून ४१ वातानुकूलित तर ४० साध्या बस खरेदी करण्याचा निर्णय परिवहन समितीच्या सभेत घेण्यात आला आहे. तसेच यापूर्वी ७ मीटरच्या बस खरेदी करण्यात येणार होत्या. परंतु या बस प्रवासी आसन क्षमता कमी आहे. तर ९ मीटरच्या बसची आसन क्षमता जास्त आहे. परंतु दोन्हींसाठी खर्च तेवढाच आहे. यामुळे नऊ मीटरच्या बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला. तर शहराबाहेरील मार्गावर १२ मीटरच्या बस चालविण्यात येणार आहेत. यामुळे ठाणेकरांना प्रवासी सुविधा मिळण्याबरोबरच टीएमटीच्या उत्पन्नात वाढ होईल, असेही सभापती विलास जोशी यांनी सांगितले.