ठाणे शहरात नव्याने उभे राहिलेल्या गृहसंकुलांमुळे वाढलेल्या लोकसंख्येचा अभ्यास करून गर्दीच्या अशा सहा बस मार्गावर टीएमटीच्या बस फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गांवर २८ बसगाड्यांच्या माध्यमातून ३२५ फेऱ्या होत असून याठिकाणी आता १५ बसगाड्या वाढविण्यात आल्याने १४० फेऱ्या वाढणार आहेत, अशी माहिती परिवहन समिती सभापती विलास जोशी यांनी दिली.

ठाणे शहरात मोठी गृहसंकुले उभी राहिली असून याठिकाणी नागरिक वास्तव्यास आले आहेत. या परिसरातील काही मार्गांवर प्रवाशांच्या तुलनेत पुरेशा टीएमटीच्या बसगाड्या सोडण्यात येत नव्हत्या. त्यामुळे अशा मार्गांवर बसगाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत होती. या पार्श्वभूमीवर शहरात नव्याने उभे राहिलेल्या गृहसंकुलांमुळे वाढलेल्या लोकसंख्येचा अभ्यास करून गर्दीच्या अशा सहा बस मार्गावर टीएमटीच्या बस फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सभापती विलास जोशी यांनी दिली.

बस फेऱ्या वाढविण्यात आलेल्या लोकमान्यनगर, उपवन, पवारनगर, ओवळा, बोरीवडे गांव आणि धर्माचा पाडा ब्रम्हांड सोसायटी या मार्गावर २८ बस गाड्या चालविण्यात येत होत्या. त्यामध्ये आता १५ बस गाड्या वाढविण्यात आल्या आहेत. यामुळे या मार्गावर सुरु असलेल्या ३२५ फे-यांमध्ये १४० अतिरिक्त बस फे-यांची वाढ होऊन एकूण ४६५ फे-यांव्दारे प्रवाशांना सेवा देण्यांत येणार आहे. या वाढीव फे-या देण्याकरिता प्रभागातील नगरसेवक, ठाणे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष मिलींद बल्लाळ आणि घोडबंदर प्रवासी संघाचे बशीर पटेल यांनीही वेळोवेळी मागणी केली होती, असेही जोशी यांनी सांगितले.

नव्याने खरेदी करण्यात येणा-या सिएनजी बसगाड्या ताफ्यात दाखल होताच ठाण्यातुन मुंबई, नवी मुंबई, बोरिवली, भिवंडी, दिवा, डोंबिवली या मार्गावरही प्रवाशांच्या मागणीनुसार बस सेवा सुरु करण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार ८१ इलेक्ट्रिक बसेस बस ताफ्यात दाखल होतील. यामुळे संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात ठाणे परिवहन सेवेची बस सेव प्रवाशांच्या सेवेसाठी देऊ शकू असे त्यांनी सांगितले.