‘बेस्ट’च्या स्पर्धेमुळे शहराबाहेरील बससेवा कमी करणार; शहरांतर्गत बसफेऱ्या वाढवणार

नीलेश पानमंद, ठाणे</strong>

मुंबईतील ‘बेस्ट’ उपक्रमाने प्रवासी संख्या वाढवण्यासाठी तिकीटदरांत कपात केल्याचा परिणाम आता अन्य महापालिकांच्या परिवहन उपक्रमांवरही दिसून येऊ लागला आहे. ‘बेस्ट’च्या धर्तीवर ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमानेही (टीएमटी) भाडेकपात करण्यासंदर्भात चाचपणी सुरू केली आहे. दुसरीकडे, ‘बेस्ट’च्या स्वस्त प्रवासामुळे टीएमटीच्या बसफेऱ्यांचा प्रतिसाद घटण्याची शक्यता गृहीत धरून टीएमटीने शहराबाहेर जाणाऱ्या बसफेऱ्यांची संख्या कमी करण्याचा विचार चालवला आहे. त्याऐवजी शहरातील गर्दीच्या मार्गावरील बसफेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.

ठाणे परिवहन उपक्रमामार्फत शहरातील विविध मार्गावर दररोज सुमारे ३१० बसगाडय़ा चालविण्यात येतात. त्यामध्ये जीसीसी तत्त्वावरील १९० बसगाडय़ा आणि ३० वातानुकूलित बसगाडय़ांचा समावेश आहे. टीएमटीला बस भाडय़ातून दररोज २८ लाखांच्या आसपास उत्पन्न मिळते. त्यापैकी ठाणे-बोरिवली या मार्गावरील वातानुकूलित बसगाडय़ाद्वारे ४ ते ५ लाख रुपयांचे सर्वाधिक उत्पन्न मिळते, तर याच मार्गावर साध्या बसगाडय़ांद्वारे दीड ते दोन लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र, या मार्गावर बेस्टच्या साध्या बसचे भाडे २० रुपये इतके झाले आहे, तर टीएमटीच्या बसचे भाडे ३० रुपये इतके आहे. तिकीट दरात दहा रुपयांची तफावत असल्यामुळे प्रवासी बेस्टच्या स्वस्त प्रवासाकडे वळून टीएमटीच्या उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच या मार्गावर बेस्टच्या वातानुकूलित बसचे भाडे २५ रुपये इतके असणार आहे, तर टीएमटीच्या वातानुकूलित बसचे भाडे ८५ रुपये इतके आहे. या तिकीट दरात ६० रुपयांची तफावत आहे. तूर्तास या मार्गावर बेस्टने वातानुकूलित बस सेवा सुरू केली नसल्यामुळे टीएमटीला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, ही सेवा सुरू झाल्यानंतर टीएमटीच्या वातानुकूलित बस प्रवाशांची संख्या रोडावण्याची शक्यता असून यामुळे टीएमटीला सर्वाधिक उत्पन्नाच्या मार्गावरील उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर या मार्गावरील बसगाडय़ा शहरातील अंतर्गत गर्दीच्या मार्गावर वळविण्याचा विचार सुरू केला असून त्यासाठी शहरातील सर्वच बस मार्गाचे पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. या संदर्भात ठाणे परिवहनचे व्यवस्थापक संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

ठाणे महापालिका क्षेत्रातील ९४ मार्गावर टीएमटीच्या बसगाडय़ा चालविण्यात येतात. या मार्गावर दररोज आठ हजारांहून अधिक बसफेऱ्या होतात. या सर्वच मार्गाचे फेरसर्वेक्षण करण्यात येणार असून त्यामध्ये गर्दीच्या आणि कमी गर्दीच्या मार्गाचा आढावा घेण्यात येणार आहे. त्याआधारे कोणत्या मार्गावर बसफेऱ्या वाढवायच्या आणि कोणत्या मार्गावर बसफेऱ्या कमी करायच्या याचे नियोजन केले जाणार आहे. याशिवाय, शहराबाहेरील मार्गावर चालविण्यात येणाऱ्या बसगाडय़ा शहरातील गर्दीच्या अंतर्गत मार्गावर चालविण्यात येणार आहेत.

दरपत्रक

बेस्ट

अंतर  (किमी)   साधे    वातानुकूलित

५                          ५               ६

५ ते १०               १०               १३

१० ते १५             १५               १९

१५ पेक्षा पुढे         २०                २५

टीएमटी

अंतर (किमी)    साधे    वातानुकूलित

२                        ७             २०

४ ते ६                १३            ३०

१० ते १२           २१            ५०

१४ ते १६           २२            ५५

२० ते २२           २५            ७५

२४ ते २६          २६             ८०

२८ ते ३०         ३०              ८५

३२ ते ३४         ३३              ९५

३८ ते ४०        ३६              १०५

(दर रुपयांत)