ठाणे : ठाणे शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला खासगी कंपन्यांमार्फत स्वच्छतागृहे उभारून त्यावरील जाहिरातींचे हक्क त्यांना देण्याची योजना ठाणे महापालिकेने आखली होती. मात्र, या योजनेतील ३० पैकी १९ स्वच्छतागृहांचे काम अद्याप रखडले आहे. विशेष म्हणजे, काही बंद शौचालयांच्या जागेत जाहिरातींचा धंदा तेजीत सुरू आहे.
स्वच्छ भारत अभियानाचा भाग म्हणून महापालिकेने शहरात खासगी लोकसहभागातून शौचालये उभारणीचा निर्णय घेतला होता. संबंधित ठेकेदाराला जाहिरात हक्क देऊन त्याच्याकडून शौचालयांची बांधकामे करून घेतली जाणार होती. या योजनेत दोन ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच एकूण ३० शौचालयांची उभारणी केली जाणार होती. घोडबंदर भागातील मुंबई-अहमदाबाद महामार्ग, बाळकुम, ठाणे शहर, कॅडबरी चौक, कळवा आणि मुंब्रा या भागांमध्ये ही शौचालये उभारणीचे नियोजन होते. या शौचालये उभारणीची कामे पूर्ण झालेली नसतानाही ठेकेदाराने जाहिरात फलक उभारून व्यवसाय सुरू केल्याचा प्रकार अगदी सुरुवातीलाच उघडकीस आला. तेव्हापासूनच ही योजना वादग्रस्त ठरली. ठाणे शहरातील मानपाडा, माजिवाडा, बाळकुम तसेच इतर भागांमध्ये अशा शौचालयांची उभारणी करण्यात आली असली तरी मानपाडा आणि बाळकुम भागातील शौचालये बंदावस्थेत आहेत. मानपाडा शौचालयाला टाळे लावण्यात आलेले आहे. असे असतानाही शौचालयांच्या बाजूला ठेकेदाराने उभारलेल्या जाहिरात फलकांवर मोठय़ा जाहिराती झळकताना दिसून येत आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेली शौचालये बंदावस्थेत असताना दुसरीकडे ठेकेदाराचे मात्र चांगभले होत असल्याचे चित्र आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येते.
केवळ सात शौचालये सुरू
ठाणे महापालिका महामार्ग तसेच प्रमुख रस्त्यांच्या कडेला नागरिकांच्या सोयीसाठी जाहिरात हक्क देऊन ३० शौचालये उभारण्यात येणार होती. त्यासाठी नेमलेल्या दोन ठेकेदारांनी आतापर्यंत ११ शौचालयांची उभारणी केली असून त्यातील सहा ते सात शौचालये सुरू झाली आहेत, उर्वरित शौचालये लवकर सुरू करण्यात येतील, असे पालिकेच्या जाहिरात विभागाचे उपायुक्त मारुती खोडके यांनी सांगितले.