डोंबिवली : अलीकडेच रूंद आणि सिमेंट काँक्रीटचा करण्यात आलेल्या प्रशस्त रस्त्यावर शहरातील पर्यटक कंपन्यांच्या व्होल्व्हो बस, सोबत ट्रक, टेम्पो चालक वाहने उभी करून ठेवत असल्याने सर्वाधिक वर्दळीच्या जीमखान्या रस्त्याला वाहनतळाचे रूप आले आहे. या वाहनांमुळे डोंबिवली जीमखाना रस्ता दररोज वाहन कोंडीत अडकत आहे. या कोंडीचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या शालेय बसना बसत आहे. स्थानिक रहिवासी या कोंडीने हैराण आहे. या रस्त्यावर कोंडी झाली की या रस्त्या लगतचच्या रहिवाशांना आपली वाहने रस्त्यावर काढणे अवघड होते. डोंबिवली जीमखाना रस्ता परिसरात राहत असलेले बंगले मालक, सोसायटी पदाधिकारी, स्थानिक मनसे पदाधिकारी यांनी कोळसेवाडी वाहतूक विभाग, टिळकनगर पोलीस ठाणे येथे निवेदन देऊन डोंबिवली जीमखाना ते सागर्ली रस्त्यावरील रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवण्यात असलेली बस, टेम्पो ही वाहने तातडीने हटविण्याची मागणी केली आहे. या मागणीची दखल घेण्यात येत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हेही वाचा.कल्याणमध्ये श्वानप्रेमी महिलेला नागरिकाची मारण्याची धमकी पर्यटक बसचा आकार मोठा असल्याने त्या बस रस्त्याचा एक भाग व्यापतात. या बसच्या मोकळ्या जागेत दुचाकी, बसच्या पाठीमागे ट्रक, टेम्पो चालक वाहने उभी करून ठेवतात. त्यामुळे डोंबिवली जीमखाना ते सागर्ली ते मानपाडा रस्त्यापर्यंत जागोजागी वाहने उभी करून ठेवण्यात येत आहेत. मानपाडा रस्त्याकडून डोंबिवली जीमखाना रस्त्याने अनेक वाहने डोंबिवलीत प्रवेश करतात. घरडा सर्कल, डोंबिवली शहरातील काही वाहने जीमखाना रस्त्याने सागर्ली, मानपाडा रस्त्याने शिळफाटा रस्त्यावर जातात. डोंबिवली जीमाखाना रस्त्याच्या दुतर्फा सोसायटी, बंंगले आणि काही भागात नवीन गृहसंकुले विकसित झाली आहेत. या रहिवाशांची वाहने याच रस्त्यावरून धावतात. शाळांच्या बस याच रस्त्यावरून धावतात. या वर्दळीच्या रस्त्यावर अलीकडे पर्यटक कंपन्यांच्या बस उभ्या राहू लागल्याने डोंबिवली जीमखाना रस्ता वाहन कोंडीत अडकू लागला आहे. वाहतूक विभागाने पर्यटन कंपन्यांना या बस हटविण्याची सूचना करावी. अन्यथा स्वताहून या बस हटविण्याची कारवाई सुरू करण्याची मागणी आरई ब्लाॅक रहिवासी संंघाचे दीपक पाटील आणि सहकाऱ्यांनी वाहतूक विभागाकडे केली आहे. हेही वाचा.कल्याणमध्ये अतिधोकादायक इमारतीच्या घरमालकीणीवर गुन्हा, कल्याण डोंबिवली पालिकेकडून प्रथमच आक्रमक कारवाई खासदार, आमदार यांनाही या निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांच्या मतदारसंघात हा भाग येतो. त्यांच्याकडून या गंभीर विषयाची दखल घेतली जात नाही, अशी खंत रहिवाशांनी व्यक्त केली. एक्सच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आतुर असलेल्या आमदार पाटील यांनी हा महत्वाचा विषय मार्गी लावावा, अशी नागरिकांची मागणी आहे. वाहतूक विभागाने या बस रस्त्यावरून हटविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले आहे. शहरात पर्यटन बस, अवजड वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने आणि पालिका, एमआयडीसी यांनी कधीच ही महत्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेतला नसल्याने पर्यटन कंपन्या, वाहतूकदार नाराजी व्यक्त करत आहेत. हेही वाचा.ठाणे : पाठ्यपुस्तके, गणवेशवाटपास खासगी शाळांचा नकार, ‘आरटीई’च्या विद्यार्थ्यांच्या नशिबी यंदाच्या वर्षीही प्रतीक्षा डोंबिवली जीमखाना ते सागर्ली हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. अलीकडेच हा रस्ता काँक्रीटचा करण्यात आला. हा रस्ता वाहतुकीसाठी सुलभ झाला असताना या रस्त्यावर पर्यटन बस, टेम्पो उभ्या केल्या जात आहेत. या रस्त्यावर वाहन कोंडी होत आहे. हे वाहनतळ मोकळ्या जागेत सुरू करावेत. - श्रीरंग परांजपे,रहिवासी,