ठाणे : येथील कोलशेत भागातील २०.५ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ला सव्वादोन महिन्यात ४ लाख ८५ हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. या भेटीमुळे पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा झाला आहे. यानिमित्ताने सेंट्रल पार्कला भेटी देण्याचा नागरिकांचा ओढा कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठाणे येथील कोलशेत भागातील पार्कसिटी गृहप्रकल्प परिसरात ठाणे महापालिकेला विकास प्रकल्पांतर्गत २०.५ एकरचा सुविधा भूखंड उपलब्ध झाला होता. त्यावर महापालिकेने बांधीव हस्तांतरण विकास हक्काच्या (कन्स्ट्रक्शन टीडीआर) माध्यमातून कल्पतरू विकासकाकडून ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ हे उद्यान विकसित करून घेतले आहे. या उद्यानाला विविध प्रकारची ३ हजार ५०० हून अधिक रोपे, फुल झाडे आहेत. मुघल गार्डन, चायनीज थिमने केलेले उद्यान, मोरोक्कन संस्कृतीची ओळख करून देणारे मोरोक्कन थीमचे उद्यान आणि जपानी पार्क येथील प्रमुख आकर्षण आहे. मुलांसाठी खेळायला जागा, ज्येष्ठांना चालण्यासाठी जॉगींग ट्रॅक, देशातील सर्वात मोठा स्केटींग यार्ड, लॉन टेनीस, व्हॉलीबॉल कोर्ट अशी व्यवस्था पार्कमध्ये करण्यात आली आहे. योगा, ध्यान धारणेसाठी देखील येथे स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या उद्यानाचे ९ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच हे उद्यान सर्वांसाठी खुले करण्यात आले असून याठिकाणी ठाणे शहरासह मुंबई महानगरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सव्वादोन महिन्यात ४ लाख ८५ हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. या भेटीमुळे पालिकेच्या तिजोरीत १ कोटी १६ लाखांचा महसूल जमा झाला आहे.

हेही वाचा – ठाणे : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज, ४ हजार जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई, १५५ अवैध शस्त्र जप्त

हेही वाचा – माणकोली उड्डाण पुलांवरील वाहनांमुळे रेतीबंदर फाटकात दररोज वाहन कोंडी, वाहतूक पोलीस नसल्याने स्थानिकांकडून नियोजन

‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ला सव्वादोन महिन्यात ४ लाख ८५ हजार ६२ अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. यामध्ये ३ लाख ८२ हजार ४२२ प्रौढांचा, २२ हजार ८७१ ज्येष्ठ नागरिकांचा तर, ७९ हजार ७६९ लहान मुलांचा समावेश आहे. या उद्यानातून पालिकेला आतापर्यंत १ कोटी १६ लाख ९७ हजार ४८८ रुपयांचा महसूल मिळाला आहे.