पालिका प्रशासन, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

नीलेश पानमंद
ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून र्निबधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात असतानाच दुसरीकडे वाहतूक पोलिसांच्या टोइंग वाहनांवरील कर्मचारी पोलिसांदेखतच मुखपट्टीविना शहरभर फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. टोइंग वाहनावरील पोलीस कर्मचारी या प्रकारांकडे दुर्लक्ष करतातच शिवाय काही वेळेस संबंधित पोलीस कर्मचारीही मुखपट्टीचा वापर करत नसल्याचे दिसून येत आहे.

करोनाचा संसर्ग कमी झाल्याने राज्य शासनाच्या निर्देशानुसार पालिकेने शहरातील निर्बंध शिथिल केले. या शिथिलीकरणानंतर अनेक नागरिकांकडून करोना नियमांच्या पालनाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. अशा नागरिकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. असे असतानाच पोलिसांच्या डोळ्यांदेखत टोइंग वाहनावरील कर्मचाऱ्यांकडून सर्रास करोना नियमावलीचे उल्लंघन होताना दिसून येत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर टोइंग वाहनामार्फत कारवाई करण्यात येते. या कारवाईसाठी टोइंग वाहनांवर पोलीस कर्मचारी आणि खासगी कर्मचारी नेमण्यात येतात. खासगी कर्मचाऱ्यांच्या अरेरावी आणि वर्तणुकीबाबत तक्रारी पुढे येत आहेत. यापूर्वी अशा तक्रारींच्या आधारे पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईही केल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात असलेल्या या कर्मचाऱ्यांकडून आता पोलिसांदेखतच करोना नियमावलीचे उल्लंघन होताना दिसून येत आहे. या वाहनावर तीन ते चार कर्मचारी असतात. त्यापैकी एकाही कर्मचाऱ्यांच्या तोंडावर मुखपट्टी दिसून येत नाही. हे कर्मचारी वाहने उचलून टोइंग वाहनात ठेवतात, पण त्यांच्याकडून सॅनिटायझरचा वापर होताना दिसून येत नाही. या वाहनाच्या पुढील केबिनमध्ये बसलेला पोलीस कर्मचारीही करोना नियमावलीच्या उल्लंघनाकडे कानाडोळा करतो. काही वेळेस तेही मुखपट्टीचा वापर करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर जशी कारवाई होते, तशी या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

टोइंग वाहनांवर कर्मचारी मुखपट्टीविना वावरत असल्याचे आढळून आले तर त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत महापालिकेला कळविण्यात येईल.

– श्रीकृष्ण कोकाटे, प्रभारी पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा