ठाणे : भिवंडी लोकसभा निवडणूक लढविणारे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारा दरम्यान एका व्यक्तीच्या कमरेला पिस्तुल खोचल्याचे आढळून आले. सांबरे यानी आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने पडताळणी केली असता, तो व्यक्ती १२ वर्षीय मुलगा असून त्याच्याकडे खेळण्यातील पिस्तुल असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांचा जीव भांड्यात पडला. भिवंडी लोकसभेमध्ये भाजपकडून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार) सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. काँग्रेसकडून येथील उमेदवारीसाठी मागणी होत असल्याने महाविकास आघाडीमध्ये नाराजी आहे. त्यातच या भागातील जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भिवंडीची लढत चुरशीची होणार असल्याची चर्चा आहे. निलेश सांबरे यांनी प्रचारासाठी नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी रात्री ते गायत्रीनगर परिसरातील एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर एक व्यक्ती सांबरे याच्या वाहनाजवळ पिस्तुल घेऊन उभा होता असा दावा त्यांच्या सुरक्षा रक्षकाने केला. या घटनेनंतर सांबरे यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. तसेच याबाबतची माहिती ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना दिली. सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये एक चित्रीकरण होते. हे चित्रीकरण त्या व्यक्तीच्या कमरेपासूनचे होते. त्याने कमरेवर पिस्तुल ठेवल्याचे दिसून येत होते.

हेही वाचा…ठाणे लोकसभा जागेची मागणी करणे कार्यकर्त्यांचा अधिकार, भाजप नेते प्रविण दरेकर यांचे सूचक वक्तव्य

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शांतीनगर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यावेळी ही प्लास्टिकची खेळण्यातील पिस्तुल असल्याचे समोर आले. संबंधित मुलाच्या वडिलांनी त्याला बाजारातून खेळण्यातील पिस्तुल घेतली होती. ती घेऊन तो तिथे आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. हा प्रकार गैरसमजूतीमुळे झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.