रस्त्यावरील सशुल्क पार्किंग विरोधात व्यापाऱ्यांचा बंदचा इशारा

शहरातील ७४ रस्त्यांवर सशुल्क पार्किंग सुरू करण्याच्या पालिकेच्या निर्णयावर शहरातील व्यापारी वर्गाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

उल्हासनगर : शहरातील ७४ रस्त्यांवर सशुल्क पार्किंग सुरू करण्याच्या पालिकेच्या निर्णयावर शहरातील व्यापारी वर्गाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आपल्याच दुकानाबाहेर दुकानदाराला दुचाकी उभी करण्यासाठी पैसे अदा करावे लागत असतील तर हा अन्याय असून हे धोरण रद्द केले नाही तर शहरातील बाजारपेठ बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा टीम ओमी कलानी प्रणीत उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे. पप्पू कलानीही या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवणार असल्याचे समजते.  पालिका प्रशासनाने वाहतूक नियोजनाच्या नावाखाली उत्पन्न वाढवण्याचा नवा पर्याय शोधून काढला आहे. नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील ७४ रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या वाहनांसाठी शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठांमधील रस्त्यांवर उभा केल्या जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना शुल्क द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे दुकानाच्या बाहेर दुकानदारांनाही वाहन उभे करण्याचे शुल्क द्यावे लागणार आहे.

पालिकेने जाहीर केलेल्या दरानुसार एका वाहनाचे वार्षिक शुल्क साडेबारा हजारांवर जाते. आधीच करोना टाळेबंदी आणि निर्बंधांमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या व्यापाऱ्यांना हा वेगळा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. तर दुकानात येणाऱ्या ग्राहकांनाही याचा फटका बसणार आहे. त्याचा व्यवसायावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यावर आता उल्हासनगर शहरातील व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील रस्त्यांवर उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांकडे उत्पन्नाचे साधन म्हणून पाहण्याऐवजी थकीत ६३६ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करावी अशी मागणी उल्हासनगर ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती यांनी केली आहे.

शहरात सध्याच्या घडीला वर्तुळाकार रस्ता उपलब्ध नाही, वाहनतळाची उभारणी केली गेलेली नाही. त्यामुळे वाहने उभी करण्याचा प्रश्न आहे. असे असताना नवे पर्याय उपलब्ध करण्याऐवजी रस्त्यांवर वाहने उभी करण्यासाठी पैसे घेणे चुकीचे असल्याची टीका चक्रवर्ती यांनी केली आहे. त्यामुळे पालिकेच्या या निर्णयाला व्यापारी संघटनांचा विरोध असून पालिकेने हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी संघटनांनी केली आहे. २८ जानेवारी रोजी पप्पू कलानी यांच्या अध्यक्षतेखाली सिंधु युथ सर्कल येथे व्यापारी संघटना एकत्र येऊन निर्णय घेणार असल्याची माहिती चक्रवर्ती यांनी दिली. पालिकेने वेळेत हा प्रस्ताव मागे घेतला नाहीतर शहरातील बाजारपेठा बेमुदत कालावधीसाठी बंद ठेवण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Traders warn against closed parking road ysh

Next Story
कळवा तिसऱ्या खाडी पुलाची प्रतीक्षा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी