thane borivali tunnel : ठाणे : ठाणे बोरिवली दुहेरी भुयारी मार्गाच्या निर्माणाचे काम सध्या घोडबंदर येथील मुल्लाबाग भागात सुरु झाले आहे. या भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून बोगदे तयार केले जात आहे. त्यानिमित्ताने विविध वाहने, यांत्रांची वाहतुक करणारी वाहने या भागातून वाहतुक करणार आहे. या कामा दरम्यान ठाणे वाहतुक पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहेत.
हे वाहतुक बदल आज, शुक्रवारपासून (१४ नोव्हेंबर) ते ११ मे २०२६ पर्यंत लागू केले आहेत. घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी, मानपाडा, ब्रम्हांड भागातील वाहतुक कोंडी टाळण्यासाठी अनेक वाहन चालक मुल्ला बाग मार्गे वाहतुक करत असतात. येथील वाहतुक बदलाचा परिणाम वाहन चालकांना भेडसाविण्याची शक्यता आहे.
ठाणे, भिवंडी, कल्याणकरांना बोरिवली गाठण्यासाठी घोडबंदर मार्गाचा वापर करावा लागतो. परंतु या मार्गाची अवस्था अत्यंत वाईट आहे. घोडबंदर घाट रस्त्यात दररोज वाहन चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागत असून कोंडीमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे ठाणे -बोरीवली प्रकल्पाच्या निर्माणाचे काम सध्या सुरु आहे.
हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठा आणि सर्वात लांब असून दुहेरी बोगदा आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) बांधला जाणारा हा ११.८ किमी लांबीचा भूमिगत बोगदा ठाणे-घोडबंदर रोडला थेट पश्चिम द्रुतगती महामार्गाशी जोडणार आहे. या बोगद्यामुळे सध्याचा ६० ते ९० मिनिटांचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत होणार असल्याचा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे.
काय आहेत वाहतुक बदल
– या प्रकल्पाच्या निर्मितीसाठी ठेकेदार कंपन्यांची वाहने, यंत्र या भागातून वाहतुक करतात. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी या भागात काही वाहतुक बदल लागू केले आहेत. मुल्लाबाग येथील हिलक्रिस्ट गृहसंकुल येथून नीळकंठ ग्रीन गृहसंकुलाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना सत्या शंकर गृहसंकुलाजवळ प्रवेशबंदी असेल.
येथील वाहने विरुद्ध दिशेकडील मार्गिकेवरून वाहतुक करतील. त्यामुळे या भागात वाहतुक कोंडी होण्याची शक्यता आहे. हे वाहतुक बदल शुक्रवारपासून (१४ नोव्हेंबर) ते ११ मे २०२६ पर्यंत लागू केले आहेत. वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी ही वाहतुक बदलाची अधिसूचना काढली आहे. या प्रकल्पाच्या कामामुळे लागू झालेल्या वाहतुक बदलामुळे पुढील सुमारे सहा महिने नागरिकांना त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
